थोरले साहेब - ४२

पुढील शिक्षणाबाबत मित्रमंडळींसोबत विचारविनिमय केल्यानंतर साहेबांनी घरच्यांचा विचार घेतला.  थोरल्या दोन्ही बंधूंचं कायद्याचं शिक्षण घेण्याबद्दल एकमत होतं.  एवढंच नाही तर खर्चाकरिता विट्याची वडिलोपार्जित जमीन काहीएक उत्पन्न मिळत नसल्याने विकून टाकावी असं ठरलं.  तिघे बंधू विट्याला गेले.  विक्रीखत करून परत कराडला आले.  दोन वर्षांचा खर्च भागेल एवढा पैसा जमीन विक्रीतून मिळाला.  

कायद्याचं शिक्षण साहेब पुण्याला घेणार हे साहेबांचे मित्र आमदार आत्माराम पाटील यांना कळलं.  आत्माराम पाटील व साहेबांमध्ये वैचारिक दुरावा वाढत चालला होता.  आत्माराम पाटील यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पक्का केला होता.  साहेबांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला.  त्यादरम्यान सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आत्माराम पाटील व साहेबांनी गांधीनिष्ठ कार्यकर्ते पांडू मास्तर यांना पाठिंबा दिला.  पांडू मास्तरांच्या विरोधात व्यंकटराव पवार उभे होते.  व्यंकटराव पवार हे पांडू मास्तरांना पाडून निवडून आले.  जिल्हाभर साहेब व आत्माराम पाटील याचां पराभव झाल्याची चर्चा सुरू झाली.  त्यात खोटं काहीही नव्हतं.

आत्माराम पाटलांचा साहेबांना निरोप आला, ''मी पुण्याला घर केलेलं आहे.  आपण माझ्याकडेच माझ्या घरी राहून कायद्याचा अभ्यास करावा.''

आत्माराम पाटलांना साहेब नाही म्हणू शकत नव्हते.  साहेबांनी होकार कळविला.  पुण्याला घर करण्यामागचं कारण आत्माराम पाटील यांचे पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे राहणारे देशभक्त ब्राह्मण पिंगळे यांची कन्या शांताबाई यांच्यासोबत प्रेमाचे सूत जुळले.  त्या काळातील रीतिरिवाजाप्रमाणे दोन्ही घरातून या संबंधाला विरोध होता.  आत्माराम पाटील यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.  साहेबांनी आत्माराम पाटील यांना असा सल्ला दिला की, मुलीला विचार करण्यास वेळ द्यावा.  पूर्ण विचारांती तिचा होकार आल्यानंतरच विवाह करण्यासंबंधी विचार करावा.  साहेबांचा हा सल्ला आत्माराम पाटलांना पटला.  तसा त्यांनी मुलीला भरपूर वेळ दिला.  तिनं आत्माराम पाटलांसोबत विवाह करण्याचा निर्णय कळविला.  मुलीच्या संमतीनं सातारा येथे रजिस्टर पद्धतीनं हा विवाह पार पडला.  या विवाहाचे साक्षीदार साहेब व आठल्ये होते.

विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण पाहून साहेब अवाक झाले.  प्रशस्त इमारत, समृद्ध ग्रंथालय, ज्ञानी शिक्षक.  शिक्षकांपैकी भोपटकर ल. ब. हे भाषावरील प्रभुत्वानं लक्षात राहिलेले.  सकाळी दोन तास संपल्यानंतर भरपूर वेळ मिळत असे.  साहेब इतर वेळी ग्रंथालयात बसत.  अधाशासारखे वाचन करीत.  त्याकाळी पुण्यात अनेक अभ्यास मंडळं होती.  साहेब या अभ्यास मंडळांत जाऊ लागले.  वेगवेगळ्या राजकीय विचारांवर चर्चा घडवून आणण्याचे काम ही मंडळं करीत असत.  ज्ञानात भर पडून वैचारिक निर्णय घेण्याची क्षमता या चर्चेतून वाढीस लागत असे.

पुण्यातील या एक वर्षाच्या वास्तव्यात साहेबांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.  परीक्षेची तारीख जवळ येऊन ठेपली.  अभ्यासाला वेळ अपुरा पडू लागला.  अशा अवस्थेत वर्ष वाया जाऊ नये म्हणून साहेबांनी कायद्याच्या पहिल्या वर्षाची परीक्षा दिली.  परीक्षेचा निकाल साहेबांच्या विरोधात गेला.  साहेब उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.  ३८-३९ हे एक वर्षे साहेबांचं वाया गेलं.  ही गोष्ट साहेबांच्या मनाला लागली.  आत्माराम पाटील यांच्यासोबत न राहता वेगळं राहण्याचा निर्णय साहेबांनी घेतला.  डेक्कन जिमखान्यावर साहेबांनी स्वतंत्र खोली घेऊन सहा महिने मन लावून अभ्यास केला व पहिल्या वर्षाची कायद्याची परिक्षा पास केली.