थोरले साहेब - ४८

इस्लामपूर व वडूजच्या मोर्चानं संपुर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं.  या मोर्चात पोलिस अमानुषपणे वागले.  वडूजच्या मोर्चाचं नेतृत्व परशुराम घार्गे यांनी केलं.  या तरुणानं ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या.  १९४२ च्या क्रांतीचा सिंह परशुराम घार्गे अजरामर झाला.  घार्गेसोबत ज्या क्रांतिवीरांचा ब्रिटिशांनी बळी घेतला ते हुतात्मे बलभीम खटावकर, बाळकृष्ण खटावकर, आनंदा गायकवाड, शिदू बाळा पवार, खाशाबा शिंदे, श्रीरंग शिंदे, रामचंद्र सुतार, किसन भोसले.  इस्लामपूरचा हुतात्मा पंड्या हा तरुण इंजिनियर उत्तर प्रदेशचा.  किर्लोस्करवाडीत तो नोकरीला आला.  या मोर्चात पत्‍नीला न सांगता सहभागी झाला.  घरी तरुण पत्‍नी वाट पाहत बसली.  ब्रिटिशांच्या गोळीनं इमानेइतबारे आपलं कर्तव्य पार पाडलं.  या तरुण परप्रांतीय इंजिनियरचा बळी घेतला.  घरी वाट पाहत बसलेल्या तरुण पत्‍नीचं सौभाग्य स्वातंत्र्यासाठी पणास लागलं.  विष्णू वारवाटेच्या मातेची कूस पोरकी झाली.  विष्णू वारवाटे हाही या मोर्चात हुतात्मा झाला.

क्रांतिवीर नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील चळवळीचा ब्रिटिश सरकारनं धसका घेतला.  नाना पाटलांच्या नावानं पोलिसांच्या उरात धडकी भरायची.  क्रांतिसिंह नाना पाटलांची भेट घेण्याचा प्रयत्‍न करूनही साहेबांना त्यांची भेट घेता आली नाही.  त्यांना भेटणे तसे अवघडच होते.  

सांगलीचे वसंतराव पाटील यांचं कार्य व संघटनकौशल्य अप्रतिम होतं.  पराक्रमवीर वसंतराव पाटील संघटक म्हणून यशस्वी झाले.  त्यांची दखल पुढे महाराष्ट्राने घेतली.

किसन वीर, छन्नू सिंग, पांडू मास्तर यांना अटक झाली.  चळवळीचं अतोनात नुकसान झालं.  किसन वीराचा साहेबांना निरोप आला, ''आम्ही येरवडा जेलमधून लवकरच बाहेर येणार !'' आणि हा शब्द या तिघांनी खरा करून दाखविला.  तीन महिन्यांच्या आत हे त्रिकूट येरवड जेल फोडून बाहेर आलं.  या धामधुमीच्या काळात साहेब कराडला येत असत.  घरी एक दिवस थांबले की लगेच दुसर्‍या दिवशी निघून जात.  निवांत असा वेळ त्यांच्याशी बोलण्यास मिळत नव्हता.  त्यांच्याकडून चळवळीच्या हकीकती कळत असत.  एक दिवस बाबुराव कोतवाल वर्तमानपत्र घेऊन घरी आले.  त्या वर्तमानपत्रात बातमी होती, ''साहेबांना पकडून देणारास एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.''  माझ्या हातापायातील शक्ती गळून पडली.  माझ्या डोळ्यांसमोर काळोख दाटला.  कसातरी मी मनावर ताबा मिळविला.

बाबुराव कोतवाल भूमिगत चळवळीशी एकरूप झालेले.  इतके एकरूप की, आपल्या मामापेक्षा धूर्त निघाले.  कुठल्याही गोष्टीचा थांगपत्ता ते लागू देत नसत.  गेल्या तीन-चार दिवसांपासून घराकडे फिरकलेसुद्धा नाहीत.  घरातील आम्ही सर्व जण काळजीत होतो.  स्वारी एक दिवस सकाळी सकाळी घरी येऊन धडकली.  थोडे उत्साही दिसले.

म्हणाले, 'मामी, ओळखा मी तीन-चार दिवस कुठे होतो ते !''

''आम्हाला कसं कळणार आपण सांगितल्याशिवाय ?''  मी.

''ऐका तर मग.''

आणि बाबुराव कोतवाल सांगू लागले -