थोरले साहेब - ४४

आनंदरावांच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे कुपरची माणसं उभी राहिल्यानं स्वातंत्र्य चळवळीतील निवडून आलेले तरुण नाराज झाले.  याची कल्पना साहेबांनी आनंदरावांना दिली; पण कुपरच्या दबावामुळं आनंदरावांनी साहेबांच्या तडजोडीच्या मनसुब्याकडं दुर्लक्ष केलं.  बाळासाहेब देसाई आणि साहेबांचे बंधू गणपतराव सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते.  या दोघांचा चांगला घरोबा.  गणपतरावांमुळं साहेबांची आणि बाळासाहेब देसाईंची ओळख झालेली.  शेवटी निवडणुक झाली.  बाळासाहेब देसाई निवडून आले.  पाटण तालुक्याच्या आनंदाला उधाण आलं.  पाटणला बाळासाहेब देसाईंचा जंगी सत्कार झाला.  या सत्कार समारंभाचे अध्यक्ष होते साहेब.  के. डी. पाटील, किसन वीर आणि साहेबांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीत जिल्हा ताब्यात ठेवला.  साहेब मात्र आनंदरावांसारख्या प्रांजळ मनाच्या वर्गमित्राला मुकले.

सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीला तेवत ठेवत साहेबांनी वकिलीची सनद मिळविली.  आपला मुलगा यशवंत वकील झाल्याचं ऐकून आईला आकाश ठेंगणं झालं.  आपल्या भावानं वकिलीची पदवी मिळविल्याचा आनंद ज्ञानोबा व गणपतरावांना आपल्या चेहर्‍यावर लपविता आला नाही.  मित्रासोबत मुंबईला जाऊन साहेबांनी वकिलीची सनद आणली.  वकिलीचा व्यवसाय सुरू केला.  मिळकतही बरी होऊ लागली.  स्वातंत्र्य चळवळीचा रेटा वाढतच होता.  याचदरम्यान १९४२ मध्ये कराडला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन झालं.  कराडला साहित्याची परंपरा आहे.  या संमेलनात साहेबांनी साहित्याचा एक वाचक म्हणून सक्रिय भाग घेतला.  या संमेलनात दोन परिसंवाद ठेवण्यात आले होते.  एका परिसंवादाचं अध्यक्षपद भाषाशास्त्रज्ञ कृ. पा. कुलकणी यांनी भूषविलं होतं.  दुसर्‍या परिसंवादाचं अध्यक्षपद खुद्द साहेबांनी भूषविलं.  या परिसंवादाचा विषय 'बहुजन समाज व साहित्य' असा होता.  साहेबांचं भाषण आवडल्याची कबुली कृ. पा. कुलकर्णी यांनी आपल्या 'कृष्णाकाठची माती' या आत्मचरित्रात दिली आहे.

विठाईचा लग्नाचा लकडा साहेबांच्या पाठीमागे चालूच होता.  शेवटी साहेब लग्न करायला तयार झाले.  एक-दोन मुली पाहून झाल्या.  दोन्ही भावजयाही येणार्‍या-जाणार्‍यांचं जेवणखावन-चहापाणी करण्यात दिवसभर मग्न असायच्या.

न राहवून सौ. सोनू वहिनी म्हणाल, ''वकीलसाहेब, आता आमच्या मदतीला हक्काचं माणूस घेऊन या की !''

''वहिनी, मुलगी पसंत पडली म्हणजे घेऊन येतो तुम्हाला जाऊ.''  साहेब.

''मुलींना काय काळ पडलाय ?  पण....''  सौ. भागीरथी वहिनी.

''पण म्हणजे काय वहिनी ?'' साहेब.

''नाही, म्हटलं एखादी पसंत करून ठेवली असेल तर तसं सांगा.'' सौ. भागीरथी वहिनी.

''तसलं काही मनातही आणू नका.  मुलगी पसंत पडली की लग्न करू या.'' साहेब.

दीर-भावजयांत अशी थट्टामस्करी चालायची.  शेवटी साहेबांनी मला पसंत केलं.  बळवंतराव चव्हाणांचं घर सावरता सावरता ज्या घटना घडल्या त्या जशाच्या तशाच कुठलाही आडपडदा न ठेवता विठाईनं मला सांगितल्या.