साहेबांच्या जीवनाला संपूर्ण कलाटणी देणारा दिवस २६ जानेवारी १९३२. २०, २२ जानेवारीला तांबवे येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काशिनाथपंत देशमुख व राघूअण्णा लिमये यांनी घेतली. कराडहून साहेब या बैठकीला निमंत्रित म्हणून हजर होते. २६ जानेवारी १९३२ रोजी कराड तालुक्यात विविध ठिकाणी झेंडावंदन करून सरकारला कायदेभंग चळवळीची ताकद दाखवायची तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते कारागृहात गेले पाहिजेत, असं या बैठकीत ठरलं. साहेबानं कराड आणि आजूबाजूच्या प्रमुख गावी झेंडावंदन करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली. तांबवेची बैठक संपवून साहेब कराडला परतले. सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. २६ जानेवारीच्या कामाची सर्वांना वाटणी करून दिली. त्यात कायदेभंगासंबंधीची पोस्टर्स रात्री संपूर्ण शहरभर चिकटावयाची, म्युनिसिपल कचेरीवर एका गटानं रात्री झेंडा फडकावयाचा, साहेबांनी शाळेच्या आवारातील झाडावर झेंडा फडकावयाचा असे ठरले. रात्री ११ वाजेच्या सुमारास म्युनिसिपिल कचेरीवर झेंडा फडकावला. रात्री उशिरापर्यंत ठरल्याप्रमाणे कार्यवाही झाली किंवा नाही याचा आढावा साहेबांनी घेतला. प्रमुख चौकात पोस्टर्स लागले होते. एका चौकात पोस्टर चिकटवत असताना पांडूतात्या डोईफोडे पकडला गेल्याचं कळलं. गावात सन्नाटा पसरून वातावरण तंग झालं होतं. साहेब सकाळीच ८ वाजता ठरल्याप्रमाणे मित्रांना सोबत घेऊन शाळेत गेले. झाडावर झेंडा फडकावला. ध्वजवंदन करून 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रम संपविला आणि साहेब घरी परतले.
पांडूतात्याला पकडल्यानंतर साहेबांना पकडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. पांडूतात्यानं साहेबांचं नाव घेतलं असण्याची शंका साहेबांना आली. साहेब घरातून परत शाळेत जाण्यासाठी निघाले. आज आपण पकडले जाऊ या शंकेची पाल साहेबांच्या मनात चुकचुकली. शाळेत भयाण शांतता पसरलेली. साहेब ११ वाजता वर्गात जाऊन बसले. थोड्याच वेळात साहेबांना मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून बोलावणं आलं. साहेबांना जे समजायचं ते समजलं. पोलिस अधिकार्यांनी सकाळच्या झेंडावंदनविषयी व पोस्टर्स चिकटविण्याबद्दल माहिती विचारली. त्यास साहेबांनी उत्तर दिलं.
''होय, मी हे सर्व केलं आहे आणि यापुढेही पुनःपुन्हा करीत राहण्याचा माझा संकल्प आहे.''
'' 'वंदे मातरम' घोषणा कुणाच्या सांगण्यावरून दिल्या ?'' हे पोलिस अधिकार्यानं जरा दरडावून विचारलं.
''वेदमंत्राहून प्रिय आम्हा वंदे मातरम'' असं पाणीदारपणे उत्तर साहेबांनी त्यांना दिलं. या उत्तरानं पोलिस अधिकार्याचं पित्त खवळलं. त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितलं,
''मी या विद्यार्थ्याला अटक करून घेऊन जातोय हे त्याच्या पालकाला कळवा.''
स्वातंत्र्यपंढरीचे वारकारी साहेब सत्याग्रहाच्या दिंडीत स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर घेऊन कारागृहाची वाट चालू लागले.
पोलिस चौकीत साहेबांना दिवसभर बसवून ठेवण्यात आलं. अधूनमधून या सर्व प्रकारामागे कोण आहे याची ते चौकशी करीत. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस खाक्याची धमकीही ते देत. साहेब मात्र त्यांच्या धमकीला भीक घालत नव्हते. सायंकाळ होत आली. अंधारानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. शेवटी साहेबांना दहा बाय बाराच्या अंधार्या कोठडीत कोंबलं. त्या कोठडीत अजून कोण आहे कळायला मार्ग नाही... अंथरायला-पांघरायलाही नाही... चार-पाच दिवस झालेली पायपीट... दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही... त्यामुळे साहेब थकून गेले होते. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येईना. आपल्याला अटक झाल्याचं कळल्यानंतर आईची काय अवस्था झाली असेल... या विचाराच्या तंद्रीत साहेबांनी फरशीवर अंग टाकलं. निद्रेनं साहेबांना आपल्या कुशीत घेतलं.