थोरले साहेब - ३०

बराकीमधील सर्वच गांधीजींचे अनुयायी होते.  अधूनमधून मध्यस्थांचे प्रयत्‍न चालू असल्याचे कानावर यायचे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बहुसंख्य अस्पृश्य समाज स्वातंत्र्य चळवळीकडे तटस्थाच्या भूमिकेतून पाहत होता हे साहेबांना लहानपणापासून जाणवत होतं.  त्यांना या प्रवाहात ओढण्याचा कुणी प्रयत्‍नही केला नाही.  आज त्याचे भयंकर परिणाम दिसू लागले.  अस्पृश्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याकरिता व त्यांच्या मनात राष्ट्रीय भावना पेटविण्यासाठी काही जाणूनबुजून प्रयत्‍न करावयास पाहिजे, असं बराकीमधील सत्याग्रहींचं मत झालं होतं.  शेवटी मध्यस्थींच्या प्रयत्‍नाला यश आलं.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून पुणे करारावर सही केली.  राष्ट्रीय मनाची फाळणी टळली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींचे प्राण वाचविले.  साहेबांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा असलेला आदर अधिकच वृद्धिंगत झाला.

महात्मा गांधी येरवडा जेलमध्ये असताना कॅम्प जेल बराकीमधील सत्याग्रहींनी वरिष्ठाकडे मागणी केली की, प्रत्येक बराकीमधून निवडक सत्याग्रहींना महात्मा गांधींना भेटण्याची परवानगी द्यावी.  वरिष्ठांनी जेलप्रमुखासमोर सत्याग्रहींची ही मागणी ठेवली.  जेलप्रमुखांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून प्रत्येक बराकीतील सत्याग्रहींनी आपल्यामधून दोन सत्याग्रही निवडायचे व त्या निवडलेल्या प्रतिनिधींना महात्मा गांधींना भेटता येईल असा निर्णय घेतला.  महिन्याला किंवा दोन महिन्यांना निवडलेले प्रतिनिधी महात्मा गांधींना भेटून येत.  प्रतिनिधींची महात्मा गांधींसोबत झालेली चर्चा ऐकण्यासाठी बराकीतील सत्याग्रही उत्सुक असत.  महात्मा गांधी राजकीय चर्चा करण्याचे टाळीत असत.  विधायक कार्य किंवा वैचारिक प्रश्नांसंबंधी विचारविनिमय करीत असत.  योगायोग असा की, कॅम्प जेलमध्ये महात्मा गांधीजींचे चिरंजीव रामदास गांधी होते.  कॅम्प जेलचे प्रतिनिधी म्हणून तेही महात्मा गांधींना भेटून आले होते.  त्यांनी सर्व बराकीमध्ये जाऊन महात्मा गांधींबरोबर झालेल्या चर्चेचा वृत्तांत दिला होता.

साहेबांचे जिवलग मित्र गौरीहर सिंहासने, शेजारच्या १३ नंबरच्या बराकीमध्ये स्थानबद्ध होते.  त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा झालेली होती. संघटनचातुर्याच्या जोरावर त्यांनी अनेक जिवलग मित्र मिळवले होते व ते बराक नंबर १३ चे प्रमुख झाले होते.  बराक नं. तेरामधून गौरीहर यांचा साहेबांना निरोप आला की, ''त्यांच्या बराकीतील सत्याग्रहींनी त्यांची गांधीजींना भेटण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवड केली.''  बर्‍याच दिवसानंतर साहेबांच्या जीवनात आनंदाचा क्षण आला.  गौरीहर आणि साहेबांनी गांधीजींच्या आदेशावरून असहकार चळवळीमध्ये भाग घेतला आणि जेलमध्ये आले.  गौरीहर यांच्या चळवळीतील निष्ठेला फळ आल्याची जाणीव साहेबांना झाली.  आपल्या मित्राला गांधीजीला भेटता आलं यातच आपलं कार्य सत्कारणी लागलं.  गौरीहर गांधीजींना भेटून आल्यानंतर त्यांनी साहेबांना सांगितलेली हकीकत अशी :

चळवळीच्या निमित्ताने गौरीहर व त्यांच्या कुटुंबात जो दुरावा निर्माण झाला होता तो गौरीहर यांनी महात्माजींच्या कानावर घातला.

गांधीजी म्हणाले, ''तुम्ही जर सत्याग्रहाचा निर्णय स्वतः घेतला असेल तर तुम्ही घरच्यावर अवलंबून राहायचे नाही.  आता तुम्हीच तुमचे जीवन घडविण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.''

सिंहासने यांचे शिक्षण कमीच होते; पण चळवळीवरील निष्ठा अत्यंत प्रामाणिक होती.  गांधीजींनी दाखवलेल्या वाटेवरून जाण्याचे सिंहासने यांनी ठरविले.  जेलमधील गांधीजींची भेट म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळविले या धुंदीत सिंहासने वावरत होते.  सिंहासनेंएवढाच आनंद साहेबांना झाला होता.