थोरले साहेब - २५

सभा संपली.  लोक एक-एक करून घरी परतले.  देशपांड्याच्या वाड्यात या दोघांना निरोप देण्यात आला.  येथे सभा झाल्याची माहिती पोलिसांच्या कानी नव्हती.  देशपांडे यांनी सांगितलेल्या मार्गांनी हे दोघे मलकापूरला पोहोचले.  मलकापूरहून कोल्हापूरमार्गे कराडला असा या दोघांचा परतीचा मार्ग होता.

राघूअण्णा लिमये हे मूळचे कोकणातले.  ते साहेबांना म्हणाले, ''आपण इकडे आलोच आहोत तर कोकणात जाऊन यायचं का ?''

साहेबांना राघूअण्णा लिमये यांचा कोकणात जाण्याबद्दलचा विचार आवडला.  साहेबांनी लिमये यांना होकार दिला.  त्यापाठीमागे साहेबांचा स्वार्थ होता तो म्हणजे एकतर साहेबांना समुद्र पाहण्याची तीव्र इच्छा आणि दुसरे आकर्षण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्याची.

मलकापूरचा घाट ओलांडताच साखरपे गाव लागतं.  या साखरपे गावच्या परिसरात लिमयेंच्या पूर्वजांचं गाव असावं.  लिमये यांनी आपल्या पूर्वजांपैकी कुणी वंशज येथे आहे का याचा शोध घेतला.  शेवटी एका लिमयेचं घर सापडलं.  साहेब आणि लिमयेंनी येथे मुक्काम केला.  गावाचा परिसर लिमये आणि साहेबांनी तुडवला.  लिमयेंना आपल्या पूर्वजांच्या वंशाला भेटल्याचा आनंद झाला.  कोकणस्थ असूनही त्यांनी या दोघांची जेवणाची व्यवस्था केली.  साहेब मराठा असल्याची कल्पना लिमयांनी त्यांच्या वंशजाला दिली होती.  दुपारी जेवतेवेळी साहेबांचं एकट्याचं पात्र सोफ्यात लावण्यात आलं.  लिमयांचे वंशज मनूच्या धर्माचे पालन करणारे असावे.  लिमयेंना अवघडल्यासारखं झालं.  लिमयेंनी आपलं पात्र उचललं आणि साहेबांचं पात्र जिथं लावलं होतं तिथं ते येऊन बसले.  साहेबांसोबतच त्यांनी जेवण केलं.  यामुळे लिमयेंचे वंशज खजील झाले.

जेवण संपल्यानंतर या दोघांनी लिमयेंच्या वंशजाचा निरोप घेतला व रत्‍नागिरीला पोहोचले.  रत्‍नागिरीला सागरदर्शन व सावरकरांची भेट घेतली.  सावरकरांनी नाशिकच्या अनंत कान्हेरेची आठवण काढली.  या तेजस्वी वीराची भेट घेऊन साहेब व लिमये कराडला परत आले.

साहेबांचा शालेय मित्र अहमद कच्छी अत्यंत तल्लख बुद्धीचा, अभ्यासू होता.  त्याची इच्छा साहेबानं प्रथम शिक्षण पूर्ण करावं व नंतर कायदेभंगाच्या चळवळीत भाग घ्यावा अशी होती.  त्याचं मुंबईला जाणंयेणं होतं.  मुंबईत त्याला जी चांगली पुस्तकं मिळत ती तो घेऊन येत.  साहेबांना वाचावयास देत.  काही प्रसिद्ध अशा गुजराती साहित्यिकांची पुस्तकंही तो आणायचा.  त्याचा मराठीत अर्थ समजून सांगायचा.  प्रसिद्ध गुजराती कवी कलापी यांची पुस्तकं तो साहेबांसाठी घेऊन यायचा.  साहेबांना गुजराती भाषा शिकवायचा.  या गुजराती शिकण्याचा उपयोग पुढे साहेबांना झाला.  त्याची इच्छा असूनही त्याला कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेता नेत नव्हता; पण चळवळीत भाग घेणार्‍याबद्दल त्याच्या मनात सहानुभूती होती.  त्याला करता येईल तेवढी मदत तो साहेबांना व इतरांना करीत असे.