थोरले साहेब - २९

रशियन राज्यक्रांती थक्क करून सोडणारी आहे.  साहेबांनी रशियन क्रांतीचं साहित्य वाचून हातावेगळं केलं.  लेनिनचं कार्य ऐतिहासिक स्वरूपाचं आहे, असं साहेबांचं मत झालं.  राजकीय व आर्थिक स्थितीचं विश्लेषण करताना लेनिनच्या बुद्धीचा कस लागलेला दिसल्याचे त्यांना दिसले.  लेनिनची निर्णयशक्ती आश्चर्यकारक होती.  लेनिनच्या विचारातून साहेब बाहेर पडतात न पडतात तोच ह. रा. महाजरी यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांची ओळख साहेबांना करून दिली.  मानवेंद्रनाथ रॉय यांच्या कार्याचा वृत्तांत ऐकून साहेब मानवेंद्रनाथ रॉय यांच्याकडे झुकू लागले.  मानवेंद्रनाथ रॉय यांनी रशियन क्रांतीनंतर संघटना बांधणीत लेनिनबरोबर महत्त्वाची भूमिका पार पाडली.  या भारतीयाबद्दल साहेबांच्या मनात आदर निर्माण झाला.  साहेबांना रॉयच्या विचाराची ओळख डॉ. शेट्टींकडून जेलमध्ये झाली.  भुस्कुटे यांनी मार्क्सच्या विचाराची अनेक पुस्तके साहेबांना जेलमध्ये वाचावयास दिली.  पुस्तकं तशी समजावयास कठीण होती.  त्यातील 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' या पुस्तकाचा अभ्यास साहेबांनी भुस्कुटे यांच्याजवळ बसून केला.  १२ नंबरच्या बराकीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या सत्याग्रहींची साहेबांनी ओळख करून घेतली.  सोलापूरचे अनंतराव भोसले नवे सत्याग्रही मित्र मिळाले.  राघूअण्णांचा कल पुस्तकं वाचण्यापेक्षा खेळाकडे जास्त होता.  त्यांनी 'चला खेळू या' नावाचा क्लब सुरू केला.  हुतुतू, आट्यापाट्या, खो-खो खेळामध्ये सत्याग्रही भाग घेऊ लागले.  साहेबही या खेळात भाग घेत असत.

या काळात आई आणि गणपतराव दोन-चार वेळा साहेबांना भेटून आले होते.  साहेबांची तब्येत पाहून आईला आनंद झाला.  गणपतराव बरीच नवनवीन पुस्तकं साहेबांना भेटतेवेळी वाचण्यासाठी देत असत.  बराक नं. १२ म्हणजे महाराष्ट्राच्या समाजजीवनाची शाळाच झाली होती.  त्यात महाराष्ट्रातील उच्चभ्रू वर्गातील सत्याग्रहींची संख्या अधिक होती.  महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाविषयी अनेक गैरसमज या मंडळींच्या मनामध्ये होते.  म. फुले यांच्या विचाराच्या बाबतीत ही मंडळी अशिक्षित होती.  अपवाद एस. एम. जोशी व ह. रा. महाजनी यांचा.  ह. रा. महाजनी स्लेट पाटीच्या दोन्ही बाजूंनी सुविचार लिहित असत.  ती पाटी बराकीमधून फिरविण्यात येत असे.  त्यांच्या पत्रकारितेचा पाया या बराकीत रचला गेला.  या बराकीतील वीर माने हे कोल्हापूरचे सत्याग्रही.  त्यांचे वागणे, बोलणे हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक होते.  स्वातंत्र्यासाठी मन चेतलेलं, पेटलेलं होतं.  बराकीतील शौचालय साफ करण्याचं काम त्यांनी स्वतःहून पत्करलं होतं.  त्यांना एस. एम. जोशींचं सहकार्य होतं.  माने साहेबांचे जिवलग मित्र झाले.  साहेब कोल्हापूरला शिक्षणाला गेले असता दोघांत मैत्रीचे धागे बळकट झाले.  

ब्रिटिश सरकारनं भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्यलढ्याची ऊर्मी कमकुवत करण्याकरिता अनेक कुटिल कारस्थानं आरंभिली.  त्यातलंच एक कारस्थान म्हणजे 'कम्युनल ऍवार्ड'.  शेडयुल कास्टना स्वतंत्र मतदारसंघ देऊन एका समाजाला दुसर्‍या समाजापासून वेगळं करण्याचा हा कुटिल डाव ब्रिटिशांनी टाकला.  यापूर्वीचा अनुभव भारतीयांच्या पदरी होताच.  मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ देऊन देशाच्या समाजजीवनामध्ये दुफळी निर्माण केली होती.  अस्पृश्य ठरविलेल्या समाजाला हिंदू समाजातून वेगळं करण्याच्या या निर्णयाला राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी विरोध करण्याचं ठरवलं.

एक दिवस १२ नंबरच्या बराकीत महात्मा गांधी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या विरोधात उपोषणाला बसल्याची बातमी येऊन धडकली.  देशभर या उपोषणाच्या संदर्भात चर्चा सुरू झाली.  राष्ट्रीय पातळीवर नेत्यांची धावपळ सुरू झाली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा करावयास पाहिजे, त्यांची आणि महात्मा गांधी यांची भेट घडवून आणावी या आणि अशा अनेक मार्गांचा अवलंब करून महात्मा गांधींचे प्राण वाचविले पाहिजे या मताशी सारा देश एकवटला होता.  डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेबद्दल सर्वांच्या मनात आदर होता; पण काही अतिरेक विचार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व इंग्रजांचे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असावा याबद्दल सूर जुळत आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींसोबत चर्चा करण्यास तयार होतील की नाही याबाबत नाराजी व्यक्त करत होते.  १२ नंबरच्या बराकीमध्ये रात्रंदिवस या चर्चेला उधाण आलं होतं.  सकाळ-संध्याकाळ बराकीमध्ये गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून प्रार्थना करण्यात येऊ लागली.