थोरले साहेब - २२

या ठरावांमुळे बैठकीचा नूरच बदलला.  जिल्ह्यातील आणि प्रांतिकच्या नेत्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केले.  या उपसूचना मान्य करू नये अशा भावना व्यक्त केल्या.  माधवराव बागल यांच्या उपसूचनेच्या बाजूने व प्रांतिकच्या नेत्यांनी उपसूचनेला जो विरोध दर्शवला त्याविरोधात जी मंडळी उभी राहिली त्यात साहेबही होते.  हे सर्व पाहून जिल्हा व प्रांतिकच्या नेत्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली.  साहेबांना आश्चर्य वाटले.  या उपसूचनेत वावगं ते काय होतं ?  शेतकर्‍यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर जर ही परिषद काहीच मत व्यक्त करीत नसेल तर शेतकर्‍यांनी कशासाठी या चळवळीत भाग घ्यायचा ?  जे शेतकरी प्रामाणिकपणे जीवाला जीव देऊन हा लढा लढत होते त्यांचा वाली कोण ?  त्यांच्या त्यागाला वार्‍यावर सोडणार का ?  या परिषदेच्या निमित्तानं असे अनेक प्रश्न निर्माण झाले.  शहरी नेतृत्वाला फक्त स्वातंत्र्य हवंय.  त्यातून निर्माण होणार्‍या आर्थिक व सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांना काहीएक देणेघेणे नाही.  साहेबांना आपले बंधू गणपतराव यांची आठवण झाली.  गणपतरावांचंही हेच मत होतं.  माधवराव बागलांचं भाषेवर प्रभुत्व होतं.  अभ्यासपूर्ण मुद्दे बैठकीसमोर मांडले. आपल्या परीनं या उपसूचनेचं महत्त्व पटवून दिलं; पण व्यर्थ गेला प्रयत्‍न.  अध्यक्षांनी या सर्व उपसूचना नियमबाह्य ठरवून त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.  नियामक समितीची बैठक संपली.

माधवराव बागल यांच्याशी परिचय करून घेण्याचं वय साहेबांचं नव्हतं.  शाळकरी वयातील साहेबांनी परिचय करून घेण्याचा प्रयत्‍नही केला नाही.  या परिषदेचं खुलं अधिवेशन सायंकाळी होणार होतं.  खुल्या अधिवेशनाला माधवराव बागल जाताना साहेब मित्रासोबत त्यांना भेटले व म्हणाले,

''जिल्ह्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या मताशी सहमत आहोत.  आपण आपली उपसूचना खुल्या अधिवेशनात उपस्थित करावी अशी विनंती आमची आपणास आहे.''

संध्याकाळी खुल्या अधिवेशनाला पंधरा ते वीस हजारांचा जनसमुदाय जमलेला.  ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी होते.  या विचारपीठावरील मानसन्मान, हार-तुरे इत्यादी सोपस्कार पार पडल्यानंतर माधवराव बागल बोलावयास उभे राहिले.  या सभेला लाऊडस्पीकरची व्यवस्था नव्हती.

माधवराव म्हणाले, ''मी शेतकर्‍यांचे प्रश्न प्रथमच या परिषदेसमोर मांडतोय.''

माधवरावांचं घणाघाती भाषण शेतकरी कान लावून ऐकू लागले.  त्यांचं अर्थपूर्ण वाक्य शेतकर्‍यांच्या अंगावर काटे उभे करीत होतं.  हृदयस्पर्शी भाषणानं शेतकर्‍यांची मनं हेलावून गेली.  भाषणात सारखा टाळ्यांचा कडकडाट होत होता.  माधवराव बागलांनी सभा जिंकली.  त्यांनी आपली उपसूचना लोकांच्या मान्यतेसाठी लोकांसमोर मांडली.  लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटांत उपसूचनेला आपली मान्यता दिली.  कागदोपत्री या ठरावाचे पुढे काय झाले माहीत नाही.  त्याची साहेबांना गरजही वाटली नाही.  माधवराव बागल आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांनी ही सभा जिंकली.  शेतकर्‍यांच्या प्रश्नाला राजकीय व्यासपीठावर वाचा फोडण्याचे श्रेय माधवराव बागल यांना आणि कार्यकर्त्यांना मिळाले.