थोरले साहेब - २०

शेणोलीकरांनी एक-एक चिठ्ठी उघडून पाहिली.  शेवटी साहेबांजवळ आले आणि म्हणाले, ''तू आत्मप्रौढी आहेस.  सार्वजनिक कार्यात पुढाकार घेतोस ते चांगले आहे.  देशातील थोरामोठ्याचा आदर्श तुझ्यासमोर असावयास पाहिजे.''

साहेब म्हणाले, ''मी आत्मप्रौढी नाही.  माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे.  मला तुमचं म्हणणं पटतं; पण माझ्या मनाला जे पटलं ते लिहिलं.''

साहेब हा विषय विसरूनही गेले; पण शेणोलीकरांनी शिक्षक कक्षामध्ये सहकारी शिक्षकांसोबत चर्चा केली असावी.  शाळेच्या मुख्याध्यापकांनी साहेबांची विचारपूस केली.  साहेबांनी वर्गात जे घडलं ते मुख्याध्यापकांसमोर सत्य कथन केलं.  

यावर मुख्याध्यापक म्हणाले, ''यात काही गैर नाही.''  हे मुख्याध्यापक होते पाठक.  पाठक आणि द्विवेदी या दोन शिक्षकांचा साहेबांचा जडणघडणीत मोलाचा वाटा असावा.

वाचन, भाषण याचा साहेबांना छंद जडला.  साहेब वक्तृत्व स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेत भाग घेऊ लागले.  शाळेत टिळक यांच्यावर निबंध स्पर्धा ठेवली होती. या स्पर्धेत साहेबांनी भाग घेतला आणि प्रथम पारितोषिक मिळवलं.  अशा या स्पर्धेमुळं लिहिण्याची सवय साहेबांना लागली.  वाचन, लिखाणासोबत तालुक्यातील व जिल्ह्यातील चळवळीत साहेब अग्रभागी राहत. सवड मिळाली की, कार्यकर्त्यांच्या गावी जात असत.  त्यांच्याशी विचारविनिमय करीत असत.

याच काळात सहकाराची चळवळ जोमात होती.  बंगाली तरुण जतीनदास इंग्रजांच्या डोळ्यात खुपत होता.  चौथ्या वेळेस त्याला तुरुंगात डांबण्यात आलं.  तिथे त्याचे अतोनात हाल करण्यात आले.  छळाचा अतिरेक झाला.  जतीनदासच्या बुद्धीवरील ताबा सुटला.  त्यानं जेल अधिकार्‍यावर हल्ला केला.  त्याच्यावरील आरोपात अजून एक आरोपाची भर पडली.  त्याला अंधारकोठडीची शिक्षा देण्यात आली.  या शिक्षेविरोधात त्यानं उपोषण सुरू केलं.  तेवीस दिवसांनंतर राज्यकर्त्यांनी या उपोषणाची दखल घेतली.  पुढे लाहोर कटात त्यांना गुंतविण्यात आलं.  गुन्हेगाराप्रमाणं वागवलं जाऊ लागले.  सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी राजकीय कैद्यांना काही विशिष्ट सवलती मिळाव्यात म्हणून उपोषण सुरू केलं.  राजकीय कैद्यांना गुन्हेगाराप्रमाणं वागणूक देण्याच्या विरोधात जतीनदासनं उपोषण सुरू केलं.  काही अटींवर सरकार त्यास जामिनावर सोडण्यास तयार झालं.  जामिनाच्या अटी मात्र मानहानीकारक होत्या.  जतीनदासनं त्या अटी धुडकावून लावल्या.  या कोवळ्या स्वातुंत्र्यवीरानं ६२ व्या दिवशी स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणाचं बलिदान केलं.  हा प्रसंग साहेबांच्या मनाला चटका लावून गेला.  या आणि अशा अनेक घटना, प्रसंग साहेबांच्या बालमनावर कोरले जाऊ लागले.  जतीनदासच्या जाण्यानं साहेब अस्वस्थ होऊन एकलकोंडेपणानं राहू लागले.  चार-आठ दिवस कुणाला भेटले नाहीत.  जतीनदासचा मृत्यू साहेबांच्या जिव्हारी लागला.  वर्तमानपत्रातील अशा घटनांचा साहेब गांभीर्यानं विचार करू लागले.  वरिष्ठांशी चर्चा करू लागले.