थोरले साहेब - १३

सवड मिळताच बळवंतराव देवराष्ट्राला जात.  देवराष्ट्र तसं आडवळणाचं गाव.  देवराष्ट्राला जवळचं रेल्वेस्टेशन ताकारी.  एकेदिवशी बळवंतराव कराडहून रेल्वेनं ताकारीला आले.  ताकारीला उतरून पायीच देवराष्ट्राला निघाले.  खडतर रस्ता.... रस्त्यानं चालताना त्यांचं अंग कचकच करू लागलं.  थकवा जाणवू लागला.  अशाही परिस्थितीत रेटून नेत त्यांनी देवराष्ट्र जवळ केलं.  गावात जायला एकच रस्ता.  साहेबांनी वडिलाला दुरूनच बघितलं.  धुळीनं माखलेल्या साहेबांन खेळायचं सोडून वडिलाच्या दिशेनं धूम ठोकली.  नेहमीप्रमाणं वडिलांच्या पायाला घट्ट पकडलं.  बळवंतरावांनी साहेबांना कडेवर घेतलं नाही.  त्यांच्या हाताला धरून घराकडे चालू लागले.  त्यांना एकदम अशक्तपणा जाणवू लागला.  वडिलांना पाहून इतर भावंडंही जवळ आली.  बळवंतरावांनी विठाईला आवाज दिला.  बळवंतरावांचा आवाज खोल गेलेला.  विठाईंनी मुलांना त्यांच्यापासून दूर सारलं.  त्यांना प्यायला पाणी दिलं.

पाणी पिऊन झाल्यावर बळवंतराव म्हणाले, ''मला थकवा जाणवतो, मी थोडा पडतो.  मुलांना माझ्याजवळ येऊ देऊ नको.''

विठाईनं त्यांना घोंगडी टाकून दिली.  बळवंतरावांनी त्यावर अंग टाकलं.  त्यांना सणसणून ताप आला.  त्या वेळी ताप आला म्हटलं की माणसाच्या काळजात चर्र व्हायचं.  विठाई चिंतातुर झाल्या.  त्यांनी लगेच भावाला बोलावणं पाठवलं.  दाजीबा घाटगे लगेच घरी आले.  साल्या-मेहुण्यांची भेटी झाली.

बळवंतराव म्हणाले, ''ताकारी स्टेशनला उतरताच मला ताप आल्याची जाणीव झाली; पण मी तसाच पायी आलो.''

दाजीबा घाटगे आणि विठाईला समजायचे ते समजले.  बळवंतरावांनी पाच-सहा दिवस तो ताप तसाच अंगावर काढला.  

विठाईअक्काच्या सौभाग्याचा घात करणारा काळ ताकारीपासूनच बळवंतरावांचा पाठलाग करीत होता.  बळवंतरावांना कळून चुकलं की हा प्लेगचाच ताप आहे.  लेकरं त्यांच्याजवळ जाण्यासाठी धडपडत; पण बळवंतरावांना त्यांना जवळ घेता येत नव्हतं.  वडिलांचं काळीज मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं तीळतीळ तुटत होतं.  विठाईअक्काचं कशातच मन लागत नव्हतं.  त्या सुन्न होऊन बसून राहत.  दाजीबा घाटगे विठाईला धीर देत.  बळवंतराव विठाईला जगण्याची उभारी देत.  यातच पाच-सहा दिवस निघून गेले.  शेवटी काळानं विठाईअक्काच्या सौभाग्यावर झडप घातलीच.  देवराष्ट्राला पायी आलेले बळवंतराव सर्वांना मागे सोडून निघून गेले.  पाच-सहा दिवसांपूर्वी बळवंतरावांना बिलगलेले साहेब पुन्हा वडिलांच्या कडेवर बसू शकले नाहीत.  चार वर्षांच्या साहेबांचं पितृछत्र हरपलं.  विठाई आणि बळवंतरावांच्या संसारगाड्याचं एक चाक निखळून पडलं.  संसाराचा गाडा दुःखाच्या अंधकारात रुतुन बसला.

'लाख मरावे, पण लाखाचा पोशिंदा मरू नये' असं म्हटलं जातं.  चव्हाण घराण्याचा पोषणकर्ता आधारवडच उन्मळून पडला.  या वादळात विठाईची सावली गेली.  कुटुंब उघड्यावर पडलं.  गरिबीच्या रखरखत्या उन्हात कुटुंब होरपळू लागलं. विठाईला काही सुचेनासं झालं.  त्या अबोल झाल्या.  ना असारा ना आधार.... आश्रय तेवढा दाजीबा घाटगेंचा.... तो काही मुलांच्या जन्माला पुरणार नाही.  चिता तर बळवंतरावांना जाळून गेली; पण चिंता मात्र विठाईला जिवंतपणी जाळू लागली.  डोळ्यांसमोर अंधाराचं साम्राज्य.  यातून कशी वाट शोधायची ही चिंता विठाईला सतावत होती.  माहेर जरी खाऊनपिऊन सुखी होतं तरी आपण किती दिवस इथं राहायचं ?  आशेचा एकच किरण सोबत आहे तो म्हणजे थोरला ज्ञानोबा.  ज्ञानोबा सोळा-सतरा वर्षांचा.  त्याला साथीला घेऊन आपल्याला पुन्हा हे घर सावरायचं, असं विठाईअक्कानं ठरवलं.