गाव दिसताच साहेब दाजीबाच्या खांद्यावरून खाली उतरले. रस्ता पायवाटीचा असल्याने मामाच्या वाड्याकडे धूम ठोकली. मामा घरी पोहोचेपर्यंत घरातील मंडळींचे झाले.
सकाळी दाजीबा घाटगे साहेबांना सोबत घेऊन शाळेकडे निघाले. वाटेत साहेबांचे बालसवंगडली भेटले. कुठलेही आढेवेढे न घेता साहेब शाळेची वाट चालू लागले. शाळेत साहेबांचे नाव दाखल केले. शाळेतील पटावर गुरुजींनी लिहिलेली तारीख साहेबांची जन्मतारीख ठरली. १२ मार्च १९१३ ही जन्मतारीख सोबत घेऊन साहेब ज्ञानसाधनेच्या वाटेनं निघाले.
विठाई ज्ञानोबांना रोजंदारीच्या कामावर घेऊन जाऊ लागल्या. ज्ञानोबांचं कोवळं वय. कोवळ्या वयात ज्ञानोबांना कष्टाची कामं करावी लागत. या कष्टाच्या कामातून ज्ञानोबांची सुटका कशी करावी हा एकच विचार विठाईला भंडावून सोडत असे. आपलं दुःख मनाला व आनंद जगाला सांगावा या विचारानं विठाई जीवन जगत होती. सल्लामसलत करावी असं जवळचं कुणीच नाही. आजूबाजूला सर्व तालेवार मराठ्यांची घरं. सत्तेशी लांगूलचालन करून, मिळतंजुळतं घेऊन आपलं मोठेपण मिरवीत. गरिबांची पिळवणूक करण्यात धन्यता मानीत. विठाईला कुठून प्रेरणा मिळाली माहीत नाही. बळवंतरावाच्या जागेवर थोरल्या ज्ञानोबाला नोकरीला लावण्याचं विठाईनं मनावर घेतलं. ज्ञानोबांचे वडील ज्या न्यायाधीशाकडे नोकरी करीत त्यांना भेटण्याचं विठाईनं ठरवलं. कामाच्या रगाड्यातून वेळ काढून विठाई न्यायाधीश साहेबांना भेटल्या. पितृछत्र हरपल्यानंतर मुलांची होणारी आबाळ न्यायाधीशांसमोर मांडली. बळवंतरावांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची होणाची कुचंबणा न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आली. त्यांनी विठाईला मार्ग दाखवला.
विठाई मोठी हिमतीची बाई. त्यांनी मनाचा निश्चय केला. आपल्या कच्च्याबच्च्या पिलांना सोबत घेऊन सातारला जाण्याचं ठरविलं. कराड ते कोरेगाव रेल्वेनं आणि कोरेगाव ते सातारा छकड्यानं प्रवास करून त्या सातारच्या जिल्हा न्यायालयात हजर झाल्या. जिल्हा न्यायाधीशांना भेटण्याचा प्रयत्न करू लागल्या. योगायोग असा की, त्यादिवशी कराडचे न्यायाधीश सातारच्या न्यायालयात हजर होते. त्यांची आणि विठाईची भेट झाली. विठाई मुलाबाळांसह आल्यानं त्याचा चांगला परिणाम न्यायाधीश साहेबांवर होईल असं कराडच्या न्यायाधीशांना वाटलं. त्यांनी थोडा प्रयत्न करून विठाई आणि जिल्हा न्यायाधीश साहेबांची भेट घालून दिली. विठाईनं आपल्यावर कोसळलेल्या संकटानं कुटुंबाची धूळधाण केली याचं चित्र जिल्हा न्यायाधीश साहेबांसमोर उभं केलं. मुलांची केविलवाणी अवस्था पाहून न्यायाधीशाचं मन हेलावलं. त्यांनी विठाईला आश्वासन दिलं. विठाई कराडला परतल्या.
विठाई कराडला पोहोचून आठ दिवस झाले असतील. दिलेला शब्द न्यायाधीश साहेबांनी पाळला. लगेच ज्ञानोबा बेलिफ म्हणून वडिलांच्या जागेवर रुजू झाले. सुखानं या घरात चंचुप्रवेश केला. साहेबांना कराडला पुढील शिक्षणासाठी घेऊन यावं असा लकडा ज्ञानोबांनी आईकडे लावला. इकडे साहेब सागरोबा व सोनहिराच्या सान्निध्यात हुंदडत होते. चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करीत असताना या परिसराचा लळा साहेबांना लागला. भविष्याच्या जडणघडणीत या परिसराचा प्रभाव साहेबांच्या पुढील जीवनात आढळून येतो.
ज्ञानोबांच्या हट्टापाई विठाईला साहेबाना कराडला घेऊन येणं भाग पडलं. साहेब चौथी पास झाले. ज्ञानोबा व गणपत या दोन्ही बंधूंची साहबांनी इंग्रजीमधून शिकावं अशी इच्छा होती; परंतु विठाईला मात्र सातवी पास झाल्यानंतर साहेबानं शिक्षक व्हावं व संसाराला आर्थिक हातभार लावावा असे वाटत होते. विठाईची ही इच्छा मात्र साहेबांनी पूर्ण केली नाही. दोन्ही बंधूंच्या आग्रहाखातर साहेबांना टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघा भावांच्या शाळेच्या खर्चाची तोंडमिळवणी करणं ज्ञानोबांना अवघड झालं. त्या काही शाळेची फीस ती काय ? पण गरिबांना ती फीस भरणंही मुश्कील होतं. या मुलांनी गुराढोरांचं शेण काढावं, गुराखी म्हणून त्यांच्याकडे काम करावं. गरिबाच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये अशी प्रस्थापितांची मानसिकता होती. प्रतिष्ठितांचा दृष्टिकोन गरिबांना हिणवण्याचा होता.