थोरले साहेब - १४

बळवंतराव जाऊन दोन-तीन महिन्यांचा काळ लोटला.  विठाई आणि दाजीबा एकत्र बसले.  बहीण-भावाची मुलांच्या भवितव्याविषयी चर्चा झाली.  विठाईअक्कानं इथंच रहावं व ज्ञानोबा-गणपतला पुढील शिक्षणाकरिता कराडला पाठवावं, अशी दाजीबांनी विठाईची मनधरणी केली.  दाजीबाचा हा निर्णय विठाईच्या मनाला पटत नव्हता.  मुलांची अशी वाटणी करण्यास विठाईचं मन धजत नव्हतं.  शेवटी मुलाबाळांसोबत कराडला जाण्याचा निर्णय विठाईनं घेतला.  देवघरात देव नसलेल्या कराडच्या घरात जाण्याचा दिवस जवळ आला.  विठाईला आपलं बालपण आठवलं.  या गावानं आपल्यावर केलेली माया आठवली.  या गावाला आपण आता पारखे होणार आणि गाव आपल्याला.... दाजीबाच्या डोळ्यांच्या धारा खंडता खंडत नव्हत्या.  मोठ्या जड अंतःकरणानं दाजीबान विठाईअक्काला निरोप दिला-वाटी लावलं.  देवराष्ट्राला सौभाग्याचं लेणं घेऊन विठाई माहेरी आल्या होत्या.  कराडला परतताना एकट्याच परतल्या.  कराडच्या घरासमोर क्षणभर घुटमळल्या.  याच घरात खर्‍या अर्थानं सौभाग्याचं संसारसुख मिळालं होतं.  आता त्याच घरात मला दुःख सहन करीत मुलांचं भवितव्य घडवायचं आहे या विचारातच विठाईनं घराचं कुलूप उघडलं.  

दुसरा दिवस उजाडला.  विठाईनं मोठ्या उमेदीनं कंबर कसली.  सोबत ज्ञानोबा.  ज्ञानोबाला कष्टाच्या कामाला धाडताना विठाईच्या मनाला यातना व्हायच्या; पण इलाज नव्हता.  कष्ट उपसल्याशिवाय पोटाची आग शमनार नव्हती.  ज्ञानोबा चार पुस्तकं शिकलेला.  आईची संगत करून धाकट्या भावाला शिकविण्याचं त्यानं ठरवलं.  गणपत शाळेत जाऊ लागला.  त्याच्या शिक्षणाच्या खर्चाचं तोंड मिळवता मिळवता दोघा मायलेकरांच्या नाकीनऊ येऊ लागले.  आता साहेबांचंही शाळेत जाण्याचं वय झालेलं.  दोघांच्या शिक्षणाचा खर्च विठाईला झेपणं अशक्य होतं.  हस्ते-परहस्ते भावाला सांगावा पाठवला.  दाजीबा निरोप मिळताच कराडला पोहोचले.  

कराडच्या या घरात साल्या-मेहुण्यांनी एकमेकांची केलेली चेष्टा आठवली.  ते घर आज दाजीबाला खायला उठलं.  सारखी बळवंतरावांची आठवण येत होती.  बहीण-भाऊ, भाचे-भाची सर्वांनी सोबतच जेवणं केली.

ज्ञानोबा आत्मविश्वासाने बोलत होते, ''मामा, मी काबाडकष्ट करून गणपत आणि यशवंताचं शिक्षण करू शकतो; पण आईच ऐकायला तयार नाही.  सारखी म्हणते, यशवंताला शिक्षणाकरिता देवराष्ट्राला पाठवू म्हणून.  मला हे पटत नाही.''  दाजीबाला भाचचा अभिमान वाटला.  त्यांनी ज्ञानोबांची समजूत काढली.

म्हणाले, ''ज्ञानोबा, विठाई काही वावगं बोलत नाही.  भाच्याचा अधिकारच असतो मामावर.  मी तर राधालाही यशवंतासोबत घेऊन जावं म्हणतो.  मला काही जड होणार नाही हे दोघं.  राहतील माझ्या बालगोपाळांसोबत.''  

यावर विठाई म्हणाली, ''नाही भाऊ, राधाला राहू दे इथेच.  गणपत शाळेत जातो.  मी आणि ज्ञानोबा कामाला गेल्यानंतर घरी कुणीच नसतं.  राधा सांभाळते घर.  तिला राहू दे येथे.  फक्त यशवंतालाच घेऊन जा.''

दाजीबा लहानग्या साहेबांना खांद्यावर घेऊन रेल्वेस्टेशनची वाट चालू लागले.  या संकटातही बहीण खंबीरपणे उभी राहिली, न डगमगता मुलांचा सांभाळ करू लागली याबद्दल दाजीबाला आपल्या बहिणीचा अभिमान वाटायचा.  या विचाराच्या तंद्रीतच दाजीबा कराड रेल्वेस्टेशनवर केव्हा येऊन पोहोचले हे त्यांना कळलंही नाही.  बळवंतराव कधीकधी दाजीबांना सोडण्यासाठी रेल्वेस्टेशनवर येत असत.  येथील हॉटेलमध्ये चहा घेत असत.  आज पहिली वेळ आहे बळवंतराव-दाजीबा सोबत नाहीत.  दाजीबा साहेबांना घेऊन त्याच हॉटेलमध्ये गेले.  दाजीबांनी चहा घेतला.  साहेबांना खाऊ घेऊन दिला.  बळवंतरावांच्या आठवणींना कराडच्या रेल्वेस्टेशनवर सोडून दाजीबा साहेबांना घेऊन रेल्वेत बसले.  ताकारी रेल्वेस्टेशनवर उतरले.  साहेबांना कडेवर घेतलं.  ताकारीचा अवघड रस्ता चालू लागले.  दाजीबांना पुन्हा बळवंतरावांची आठवण आली.  सासुरवाडीला बळवंतराव यायचे ते प्रसन्न चेहर्‍याने.  कधी कुणाविषयी कुरबूर नाही की तक्रार नाही.  चार दिवस आनंदात सासुरवाडीचा पाहुणचार घ्यायचे आणि तृप्‍त मनानं कराडला परतायचे.