टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना राष्ट्रीय झेंडा फडकावल्याबद्दल १८ महिन्यांची शिक्षा झाली आणि येरवडा जेलमध्ये पाठविण्यात आले. येरवडा जेल म्हणजे साहेबांच्या बाबतीत 'येरवडा विद्यापीठ' झाले. या जेलमधील कैदी-बंदिवान म्हणजे स्वातंत्र्याच्या तेजस्वी ज्योती होत्या. 'एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या न्यायाने ह. रा. महाजनी, आचार्य भागवत, साथी एस. एम. जोशी, रावसाहेब पटवर्धन आदी महापुरुषांनी समाजातल्या व महाराष्ट्रातून आलेल्या बुद्धिवंत कार्यकर्त्यांना शिक्षण दिले. याचे फार मोठे प्रभावी वर्णन पुस्तकात आले आहे.
'पुनश्च हरिओम' या आचार्य भागवतांच्या उपदेशानुसार पुन्हा शाळेत प्रवेश घेऊन साहेब मॅट्रिक झाले. गणपतरावांच्या इच्छेनुसार एलएल.बी. केली; परंतु स्वातंत्र्य चळवळीशी संबंधी कायम ठेवला. प्रस्थापित धनवान अशा सरकारधार्जिण्या कूपरशाहीविरुद्ध लढा पुकारून या देशाचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून आत्माराम बापूंना तिकीट मिळविले. ही असामान्य बाब होती. हे सर्व पुस्तकच क्रांतिवीरांच्या कामगिरीचा चैतन्यमय इतिहास आहे.
स्व. यशवंतरावजी द्विभाषिकांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी फार मोठ्या कौशल्याने काँग्रेस श्रेष्ठींचे मत महाराष्ट्राला हितकारक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हिमालयावर संकट आले त्यावेळी स्व. यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला धावून गेले. नेहरूंच्या हाकेला होकार देताना सौ. वेणुताईंचा होकार चव्हाण साहेबांनी मिळवला. दिल्लीची राजकारण बिनभरवशाचे आहे असे समजून काँग्रेस श्रेष्ठी व मान्यवर विरोधी पक्षनेते, महान उद्योगपती, पत्रकार, लेखक व विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींच्या वर्तुळात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचे महान कार्य स्व. यशवंतरावांनीच केले. सौ. वेणुताईंचा सल्ला वेळोवेळी चव्हाण साहेब घेत असत. केंद्रीय मंत्री म्हणून देशाटन केल्यानंतर साहेबांची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी पणाला लागली. 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापार्शी' या उक्तीप्रमाणे परदेशातही कै. चव्हाण साहेबांनी सौ. वेणुताईंची ज्यावेळी आठवण येत असे त्यावेळी ते पत्ररूपाने स्वतःचे मनोगत त्यांना कळवत असत. ती पत्रे मराठी साहित्याचा नमुना आहेत. जागतिक स्तरावरील महान मुत्सद्यांत त्यांची गणना होऊ लागली. यशवंतराव हे सौ. वेणुताईंना कधीही विसरू शकले नाहीत. एवढे मोठे प्रतिभासंपन्न, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकीय स्तरावरील मुत्सद्दी, परदेशातही आपली वेगळी प्रतिमा उमटविणारे स्व. यशवंतरावजी सौ. वेणुताईंच्या मृत्यूने खचले. ते सैरभैर झाले. प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी सौ. वेणुताईंच्या मुखातून स्व. यशवंतरावजींचा जीवनवृत्तांत कुशलतेने सांगितला आहे.
मराठी साहित्यसंपदेत मोलाची भर प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी घातली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.
आपला
श्रीनिवास पाटील
आय.ए.एस. (निवृत्त)
माजी खासदार, कराड लोकसभा मतदारसंघ
विश्वस्त, सौ. वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान
चॅरिटेबल ट्रस्ट, कराड
कराड
११ सप्टेंबर २०१०
गणेश चतुर्थी