बळवंतराव विट्यालाच होते. पुत्र जन्माला आल्याचा निरोप मिळाला. आनंद तर झालाच; पण सोबत चिंताही वाढली. आतापर्यंत पाच जणांच्या कुटुंबाची हातातोंडाची गाठ पडण्यासाठी रात्रीची दिवस करून कष्ट उपसावे लागत. त्यात आणखी एका तोंडाची भर पडली. शेतकर्यांचं जीवन म्हणजे तव्यावरची भाकरी. आधी चटके अन् मन मिळते भाकरी. अति अल्प शेती असणार्या शेतकर्यांना बैलजोडी ठेवणं परवडत नसतं. बळवंतरावांच्या गोठ्यात एक बैल. ते एक बैल असणार्या भाऊबंदासोबत सायड करून शेती करत असत. दररोजच्या तेलामिठाची गरज भागविण्यासाठी शेतीव्यतिरिक्त एखादं दुभतं जनावर आपल्या गोठ्यात असावं, अस बळवंतरावांना वाटलं. पोटाला चिमटा देऊन त्यांनी एका दुभत्या जनावराची तजवीज केली. एक बैल व एक दुभतं जनावर बळवंतरावांच्या दावणीला आलं.
बळवंतरावांच्या संसाराची ओढाताण चालूच होती. योगायोगानं विट्यातील एका जज्ज साहेबांच्या घरी दूध घालण्याचं काम त्यांना मिळालं. त्यातून दररोजच्या खर्चाचा प्रश्न सुटला. रतिबाच्या निमित्तानं जज्ज साहेबांच्या घरी येणंजाणं वाढलं. पुढे बळवंतराव आणि जज्ज साहेबांचा स्नेह वाढला. जज्ज साहेबांना बळवंतरावांच्या काबाडकष्टाची कल्पना आली. बळवंतरावांसाठी काहीतरी करावं असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला.
जज्ज साहेबांना भेटून आपल्याला ते काही काम देऊ शकतात का ते विचारून पाहावं, असं एक दिवस बळवंतरावांनी ठरवलं. रोज दूध घातल्यानंतर लगेच घराबाहेर पडणारे बळवंतराव आज थोडे घुटमळले. काहीही न बोलता थोडा वेळ उभे राहिले. जज्ज साहेबांनी बळवंतरावांच्या मनाची घालमेल ओळखली नि बळवंतरावांना विचारलं,
''बोला बळवंतराव, काही काम होतं का माझ्याकडं ?''
''होय साहेब.''
''काय काम होतं ?''
बळवंतराव थोडं थांबून म्हणाले, ''मला नोकरी दिली तर माझ्या कष्टाला आधार मिळेल.''
''बघतो'' एवढेच जज्ज साहेब म्हणाले.
बळवंतराव घराबाहे पडले. यांना नोकरी कुठली द्यायची याबद्दल जज्ज साहेब विचार करू लागले. बळवंतरावांना लिहिता-वाचता तर येत नाही.... जज्ज साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं. बळवंतराव बेलिफ झाले. बळवंतरावांना जज्ज साहेबांनी न्याय दिला.
बळवंतराव न्यायालयात बेलिफ म्हणून रुजू झाले. नोकरीचा पगार आणि शेतीतील तुटपुंजं उत्पन्न यावर सुखाची भाकरी मिळू लागली. सहा जणांचं कुटुंब गोडीगुलाबीनं नांदू लागलं. सुखाचे दिवस बळवंतरावांच्या नशिबी नसावे किंवा नियतीला हे सुख पाहवत नसावं. साहेबांच्या पाठीवर एक बहीण जन्माला आली. ती तशी आल्यापावली काही महिन्यांतच देवाघरी निघून गेली. या संकटातून चव्हाण कुटुंब सावरते न सावरते तोच बळवंतरावांची बदली कराडला झाली. पती-पत्नी विचारात पडले. काय करावे अन् काय नाही काहीच सुचेना. नोकरी सोडावी तर शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचं भरणपोषण अशक्य अन् बदलीच्या गावी जावं तर पगारावर कुटुंबाचं पालनपोषण होणं कठीण. दोघांचा एक विचार झाला - लेकरांना सोबत घेऊन कराडला जावं. शेती भावकीच्या हवाली केली. चव्हाण कुटुंब कराडच्या मार्गी लागलं. रतीब बंद झाला.
कृष्ण-कोयनेच्या संगमावर वसलेलं कराड. बळवंतरावांनी चांगल्या वस्तीत आपलं बिर्हाड थाटलं. इथं विट्यापेक्षा खर्च वाढलेला होता. ओढाताण होऊ लागली. विठाई घरची कामं करून इतरांकडे कामं करू लागल्या.
खर्चाचा मेळ घालता घालता दोघेही मेटाकुटीला येऊ लागले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. निसर्गनियमानुसार मुलं वाढू लागली. गरिबांनी परिस्थितीशी झुंजत झुंजत मरण येत नाही म्हणून जगायचं असतं... त्या काळी राज्यकर्त्यांचं गरिबांकडं दुर्लक्ष होतं. विट्याच्या शेतीतून येणारी रसद कधीकधीच यायची. भावकीच्या भरवशावर सोडलेली शेती बेभरवशाची झाली. ज्ञानोबा शाळेत जाऊ लागल्यामुळे खर्चात आणखीनच भर पडली.