प्रस्तावना
'थोरले साहेब' हे पुस्तक लिहून शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी महाराष्ट्रातील साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली आहे. देवराष्ट्रे, कराड, मुंबई व दिल्ली हा स्व. यशवंतरावजींच्या जीवनाचा घटनाक्रम त्यांनी अतिशय परिणामकारक आणि इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिला आहे. 'कृष्णाकाठ' हे साहेबांचे आत्मचरित्र. यात मुंबईपर्यंतचा घटनाक्रम आहे. त्यांचे 'सागरतट', 'यमुनातीर' लिहायचे राहून गेले. प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी ते काम पूर्ण केले आहे. स्व. यशवंतरावजींच्या जीवनातील सर्व घटनाक्रम सौ. वेणुताईंच्या मुखातून वदविताना लेखकांनी कमालीची सावधानता बाळगली आहे. विधानसभेची पहिली निवडणूक (१९४६) जिंकल्यावर साहेब वेणुताईंना म्हणाले, 'यशाची खरी मानकरी तूच आहेस.' त्यावर सौ. वेणुताई लगेच म्हणाल्या, 'यशाची अशी वाटणी करायची नसते.' सौ. वेणुताईंच्या मुखातून स्व. यशवंतरावांच्या आयुष्यभराचा संपूर्ण आढावाच लेखकांनी घेतला आहे.
यात 'देवराष्ट्रे' हे साहेबांचे आजाळ, कुलदैवत सागरोबा, मामा दाजीबा घाटगे अशी सर्वसाधारण खाऊनपिऊन सुखी कुटुंबाची माहिती आहे. वडील बळवंतरावांच्या लाघवी बोलण्यातून विट्याच्या न्यायाधीशांनी त्यांना बेलीफची नोकरी दिली. प्रपंच थोडाफार सुराला लागला; परंतु प्लेगच्या साथीने त्यांचा बळी घेतला. चिता बळवंतरावांना जाळून गेली; परंतु विठाईमातेला चिंता जिवंतपणी जाळू लागली. मात्र त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास होता, सागरोबावर श्रद्धा होती व शिक्षण ही एक शक्ती आहे याचा त्यांना विश्वास होता. 'नका बाळानू डगमगू, चंद्र-सूर्यावरील जाईल ढगू' असं म्हणून बळवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हितचिंतक मित्रामार्फत सातारच्या जिल्हा न्यायाधीशांना प्रत्यक्ष भेटून मोठा मुलगा ज्ञानोबाला कराड कोर्टात बेलीफची नोकरी मिळवून दिली. आपला भाऊ दाजीबा घाटग्याची मुलगी सून म्हणून विठामातेने करून आणली. त्यांच्या संसारातल्या बारीकसारीक घटनांचा समावेश लेखकाने मोठ्या कौशल्याने या पुस्तकात केला आहे.
स्व. यशवंतरावांचे मधले भाऊ गणपतराव हे सत्यशोधक समाजाचे पक्के समर्थक आणि पहिलवानी थाटाचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व होते. यशवंतरावांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांचा विश्वास होता. पुढे 'मी यशवंतराव होणार' हे वाक्य साहेबांनी खरेच करून दाखवले. शालेय शिक्षण घेत असतानाच यतिंद्रनाथांच्या बलिदानाने त्यांना स्वातंत्र्य चळवळीत खेचून आणलं. एक निर्भय-संयमी विचारवंत, लढाऊ वृत्तीचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांची ख्याती झाली. बंधू गणपतराव आणि बाळबुवा मठातले कळंबे गुरुजी यांच्या सत्यशोधक समाजातील कार्याने समाजाला दिशा दिली. यशवंतरावांचा फार मोठा मित्रपरिवार होता. या पुस्तकात अनेक मित्रांचा उल्लेख आला आहे. लेखकमहोदय यातीलच कुणी असावेत असे वाटावे इतका तंतोतंत वृत्तांत या पुस्तकात आला आहे.