विदेश दर्शन - ७७

हे शहर स्लाव्हियाची राजधानी आहे. अगदी सीमेवर आहे. नदीच्या पलीकडे एका बाजूला ५-६ मैलांवर ऑस्ट्रियाची सरहद्द आहे. तर दुसऱ्या बाजूला १० मैलांवर हंगेरीची सीमा लागते.
 
गेली हजार वर्षे येथे लढाया व आक्रमणे सतत झाली आहेत. ८००-९०० वर्षे हंगेरियनांचे येथे साम्राज्य होते. जर्मन्सनीही दोनशे वर्षे राज्य केले. तुर्की सैन्याचा हल्ला झाला होता. नेपोलियनचे सैन्य या शहरात राहून पुढे पूर्वेकडे गेले. असा सर्व जुना इतिहास आहे.

नवा इतिहास म्हणजे दुसऱ्या महायुध्दात जर्मनांनी कब्जा केला होता. त्यांच्या मगरमिठीतून १९४५ साली सुटका झाली. रशियन सैन्याने शर्थीची लढाई करून केली. रशियन सैनिकांचे येथे अत्यंत भावपूर्ण स्मारक आहे. त्या लढाईच्या गोष्टी निघाल्या तेव्हा मी विचारले, त्या सैन्याचा सेनापती कोण होता? तेव्हा येथील वडीलधाऱ्या जाणत्या मंत्र्यांनी सांगितले की 'मार्शल मालेनोव्हिस्की'. मला हे ऐकून आनंद वाटला. आपल्या स्नेह्याची कार्यभूमी म्हणून एक नवी आत्मियता वाटली. (हे मार्शल सोव्हिएट रशियाचे रक्षामंत्री होते.)

दुपारनंतर ६० मैलांवरील एक को-ऑपरेटिव्ह पाहण्यासाठी गेलो. चांगल्यापैकी कॉम्प्लेक्स म्हणून दाखविले. स्लाव्हियामधली ८५ टक्के जमीन अशा को-ऑपरेटिव्हमध्ये आहे. आम्ही सर्वत्र फिरून पाहिले. पिके उत्तम वाटली. त्यांची यंत्रसामुग्री पाहिली. सुमारे १५-२० हजार एकर जमीन या को-कॉपरेटिव्हखाली आहे. गहू, बार्ली, शुगरबीट, भाजीपाला करतात. पिगरी आहे. एक हजार गायींची आधुनिक दूधशाळा आहे. उत्तम फायदा काढतात. ७०० मेंबर्स आहेत. अर्थात् त्यांची मालकी नाही. मॅनेजमेंटमध्ये भाग घेतात. २५ वर्षांपूर्वी को-ऑपरेटिव्ह सुरू झाले.

पहिल्या पिढीतले ५-६ टक्के लोक राहिलेत. सर्व मेंबर्स ४-५ एकर जमीन घेऊन सामील झाले होते. या पंचवीस वर्षांत त्यांच्या असेट्स्ची संपूर्ण परतफेड झाली आहे. आज प्रत्येक सभासदाला वर्षाला सामान्यत: १२-१३ हजार रुपये मिळतात. परंतु सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पादनाच्या सर्व शाखांत क्रांति (रिव्होल्यूशन) झाली आहे. तिप्पट-चौपट उत्पादन वाढले आहे.

पूर्वी हे लहान शेतकरी उपासमार काढीत होते. स्लाव्हियाचे अर्थमंत्री क्रांतिकारक कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. एका छोटया शेतकऱ्याचे चिरंजीव - ते सांगत होते, त्याची २-२॥ हेक्टर जमीन होती. त्यात कुटुंबाचे भागत नसे. म्हणून त्याचे वडील फ्रान्समध्ये कोळश्याच्या खाणीवर कामगार म्हणून सात वर्षें राहिले.

पुष्कळ विचार केल्यानंतर मी या निर्णयाला आलो आहे की, समाजवाद म्हणजे केवळ संपत्तीच्या वाटणीचे शास्त्र नाही. तर वस्तुत: उत्पादनाच्या तंत्रात क्रांति करणारे शास्त्र व शस्त्र आहे.

भारतातील लहान लहान शेतकऱ्यांचा प्रश्न व अन्नउत्पादनाचा प्रश्न सोडवावयाचा असेल, तर आम्हाला मूलभूत नवा विचार केला पाहिजे.

लहान शेतकऱ्यांना कितीही कर्जे द्या. ते शेतीची नवी तंत्रे वापरू शकणार नाही. त्यांच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे हे. सहकारी सामुदायिक शेती हा यावर एकमेव उपाय आहे. नागपूर-काँग्रेसमध्ये आम्ही हा विचार स्वीकारला आणि तेथेच सोडून दिला. 'पुन:श्च हरि ओम्' केले पाहिजे.

संध्याकाळी 'झोक शॅले' (कॉटेज) म्हणून येथून जवळच डोंगररांगांमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण्यास गेलो. कार्पेथियन पर्वताच्या पायथ्याच्या या डोंगररांगा (Foot-Hills) आहेत. सुरेख वातावरण होते. छोटी छोटी कॉटेजस् आहेत. एकामध्ये शेगडी पेटवून मासे-मटन भाजण्याचे काम चालू होते. बाजूला २०-२५ माणसे बसतील अशी व्यवस्था. जिप्सी चालीवर सुरू असलेले संगीत. अधूनमधून तंतुवाद्यांवरील संगीतास, ऐकणारांची सामुदायिक साथ. एक वेगळेच वातावरण होते. आपण तर एकदम खूष झालो.