अनेक विषयांची चर्चा झाली. आर्थिक प्रश्नांबाबत त्यांना काही विशेष सांगण्यासारखे दिसले नाही. मी असे पाहिले की विश्वविद्यालयीन आणि शासकीय अर्थशास्त्री असोत, राजकीय विचारवंत आणि यशस्वी उद्योगपती वा व्यापारी असोत, त्यांना आजच्या आर्थिक कठीण परिस्थितीच्या कार्यकारणभावाचा खुलासा करता येत नाही वा त्यावरील उपाययोजनेचे दिग्दर्शन करता येत नाही. एका नव्या प्रकारच्या आर्थिक अरिष्टाला आज आम्ही तोंड देत आहोत असेच त्यांचेही मत पडले.
१० ऑक्टोबरला पुन्हा जनरल इलेक्शन जाहीर झाले आहे. आठ महिन्यांत दोन सार्वत्रिक निवडणुका हा एका विलक्षण अनुभव आहे. कोण जिंकेल हे सांगणे अगदी अवघड आहे. कोणताच पक्ष बहुमतात येणार नाही असे मत सांगणारे बरेच भेटले. बी. के. चे निदान असे मत दिसले. डॉ. आर. एम्. होनावर व दुसरे काहीजण म्हणत होते की, लेबर पार्टी थोडयाशा का होईना पण बहुमतात येईल. परंतु ही पार्टी राईट व लेफ्ट अशी महत्त्वाच्या प्रश्नावर तीव्रपणे विभागलेली आहे. त्यामुळे मजूरपक्षाचे सरकार किती दिवस टिकेल किंवा महत्त्वाचे प्रश्न किती परिणामकारकरीत्या सोडवू शकेल अशी शंका वाटते.
सामान्यपणे असे म्हटले पाहिजे की, ब्रिटनचे राजकीय जीवन अधिकाधिक रॅडिकल होत चालले आहे. लेबरने जिंकले नाही तरी ट्रेड युनियन्स बरोबर घेऊन जाण्याचे धोरण यापुढे काँझरवेटिव सरकारलाही चालवावे लागेल.
१९४५ ची निवडणुक एका अर्थाने वॉटर-शेड निवडणूक होती. ही दुसरी वॉटर-शेड निवडणूक ठरेल. कोणीही जिंको, धोरणे प्रागतिक व समाजवादी वळणाची वा तोंडावळयाची राहतील, असे एक नवे राजकीय चित्र येथील राजकीय जीवनात दिसू लागले आहे.
पाच वाजल्यानंतर योगायोगाने रवी टिकू यांचे घरी चहाच्या निमंत्रणावरून गेलो. हे एक प्रस्थ आहे. परंतु तो भारतीय तरुण येथे येऊन अत्यंत यशस्वी शिप-ओनर झाला आहे. हे यशस्वी शिप-ओनर घोटाळयात येतात असा अनुभव आहे. आशा आहे की हा अपवाद ठरेल. एक नवी ओळख म्हणून ठीक. लंडनमधला यशस्वी भारतीय म्हणून औत्सुक्य होते. त्याला भेटण्यामागे एवढाच हेतू.
हा तरुण काश्मीरी ब्राह्मण आहे. श्री. एम्. बी. कौल यास ओटावा येथे जेव्हा या भेटीसंबंधी बोललो तेव्हा ते म्हणाले, की त्यांचे आणि टिक्कूचे फार जवळचे नाते आहे. परंतु ते अजून त्याला भेटले नाहीत. कारण तो फार श्रीमंत असल्यामुळे कसा वागेल कोण जाणे! असे त्यांना वाटत होते. मी शिफारस केली की, बरा दिसतो-म्हणजे अहंकारी दिसला नाही. जरूर भेटा.
रात्री डॉ. होनावर, सौ. होनावर, शरद उपासनी व मी असे, जुनी मेक्सिकन फिल्म पाहावयास गेलो. १९५१ मध्ये या फिल्मला बक्षीस मिळाले होते. दोन-तीन तास आनंदात गेले. अशी जुनी पिक्चर्स पुन्हा पाहावयाला मिळतील का - असा विचार करीत परत फिरलो.
दुसऱ्या दिवशी १२ वाजता लंडन सोडून ओटावाकडे निघालो. बी. के. पोहोचवायला आले होते.