३७ नोवोसिबिर्रस्क
२७ जून, १९७४
आज संध्याकाळी ७ वाजताच्या विमानाने मॉस्कोस परत जात आहे. येथील लोक मोठे आदरातिथ्यशील, प्रेमळ आहेत.
काल संध्याकाळी येथील Obe या नदीवरील धरण आणि वीजउत्पादन -केंद्र पाहिले. सपाट जमिनीवर डॅम बांधला आहे. ११० स्क्वे. कि. मीटर्सचा पाण्याचा साठा आहे. या सर्व विभागास - शहरास येथीलच वीज मिळते.
सैबेरियात सर्व नद्या उत्तरवाहिनी आहेत. फार मोठया आहेत. ही Obe नदी, जिच्या दोन्ही काठांवर हे शहर वसले आहे - रशियाच्या मोठया नद्यांमध्ये ही गणली जाते. मुखाजवळ कित्येक मैल तिचा पसारा आहे. मोठया प्रमाणात जलवाहतुक, हिच्यातून चालते.
आज सकाळी हेवी इंजिनिअरिंग मशिन टूल मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट पाहिला. युध्दाचे दरम्यान पश्चिम भागातून सुरक्षिततेसाठी हे कारखाने हलविले होते. ते येथेच राहिले - वाढले - व आधुनिक झाले. रांची, बोकारो आणि भिलाई येथील बरीचशी यंत्रसामुग्री येथीलच आहे.
हरद्वारला येथूनच मशिनरी गेली आहे. हरद्वार येथे राहून आलेले दोन इंजिनिअर्स भेटले. हरद्वार एवढाच कारखाना आहे. येथे चार हजार लोक कारखान्यात आहेत. हरद्वारला मात्र १३ हजार लोक (इति एम्. एस्. कौल) आहेत.
नोवोसिबिर्रस्क म्हणजे नवसैबेरिया. प्रतिकात्मक नाव आहे व बऱ्याच अर्थाने खरे आहे नवीन शहर-तरुण शहर, भवितव्य उज्ज्वल-शहराचे; प्रदेशाचे व देशाचे. Good-by Saibaria!
३८ मॉस्को
२९ जून, १९७४
आज ९॥ वाजता मॉस्को सोडणार. गेल्या सात दिवसांची भेट पुरी झाली. काल संध्याकाळी येथील वित्तमंत्रि श्री. गरबोजेव्ह व त्यांचे इतर सहकारी यांनी प्राया हॉटेलमध्ये आमचेतर्फे भोजन दिले. योग्य ती भाषणे झाली.
त्याच्या आधी वित्तमंत्र्यांना मी निरोपाचे भेटून आलो होतो. त्या वेळी इतरांशी झालेल्या सर्व चर्चेचा मी आढावा घेतला आणि मी काय अंदाज, आशा, अपेक्षा घेऊन परत चाललो आहे याचीही त्यांना कल्पना दिली.
वस्तुत: आमचे 'निगोशिएटिंग डेलिगेशन' नाही. परंतु सोविएत सरकार ज्या वेळेस नवी योजना (१९७६-८०) बनविण्याच्या तयारीत आहे, तेव्हा आमच्या अर्थकारणात निर्माण झालेल्या तातडीच्या स्वरूपाच्या गंभीर समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यांच्या-आमच्या व्यापार व इतर आर्थिक संबंधात काय सुधारणा करण्याची निकड आहे ती मांडणी मित्रराष्ट्र म्हणून आमचे कर्तव्य आहे.