३९ ब्राटिस्लाव्हा, (झेकोस्लॉव्हाकिया)
१ जुलै, १९७४
परवा सकाळी मॉस्कोवरून ९॥ वाजता निघालो व प्राग येथे जवळजवळ त्याचवेळी पोहोचलो. २॥ तासांचा प्रवास आणि वेळेचे अंतरही तेवढेच. प्रागमध्ये इंटर-नॅशनल हॉटेलमध्ये व्यवस्था आहे. उत्तम!
दुपारी ३॥ वाजता येथील एम्बसीमध्ये भारतीय संघाच्या सभासदांना भेटण्यासाठी गेलो. येथे असलेले १०-५ भारतीय व दूतावासाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे हे संमेलन होते. सुमारे ५० माणसे स्त्री -पुरुष मिळून होती. श्री. एल्. पी. सिंग (भारतातील पूर्वीचे होम सेक्रेटरी) यांच्या दोन मुली येथे आहेत. त्यांचा जावई आय्. एफ्. एस्. मध्ये आहे. तो येथे फर्स्ट लेफ्ट. म्हणून काम करतो. सर्व वातावरण घरगुती होते. लहान मुलांची गाणी-नाच झाले. भाषणे झाली. शेवटी चहाही.
यानंतर झेक सरकारच्या एका मंत्र्यासह प्राग शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो. ६-७ टेकडयांवर आणि नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले हे एक सुंदर शहर आहे. त्याची सुंदरता, त्याच्या प्राचीनतेत आहे.
जुन्या प्रागमध्ये हिंडत असताना अरुंद रस्ते, ऐतिहासिक प्रासादतुल्य जुन्या इमारती. प्रत्येक शतकातील शिल्पाची साक्ष देण्याची वेगवेगळी चर्चेस् आणि बडे-बडे इमले. नदी ओलांडण्यासाठी १५ व्या किंवा १६ व्या शतकात बांधलेले पूल. (तसे आता अनेक पूल त्या नदीवर आहेत.) उंच टेकडीवर प्रागचे क्रेमलिन म्हणून प्रसिध्द असलेला castle व त्यामध्ये आखीव-रेखीव दिसणारे चर्च. ही सर्व पाहिली म्हणजे प्रत्यक्ष इतिहासाच्या हजेरीतच आपण आहोत, असे वाटते. त्यात नवेपणही आले आहे.
समाजवादी सरकारने मोठमोठे हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधले आहेत (तरीही येथे राहण्याच्या जागेची टंचाई आहे असे मला अनेकांनी सांगितले.) अंडरग्राउंड रेल्वे सुरू झाली आहे. मुलेबाळे घेऊन या रेल्वेने प्रवास करणे हा प्रागवासियांचा आजकालचा आवडीचा छंद झाला आहे. ८ वाजता परत आलो आणि लवकरच झोपी गेलो.
काल सकाळी प्रागवरून ९ वाजता निघून सरकारच्या एका छोटया विमानाने ब्राटिस्लाव्हा या शहरात पोहोचलो. हे शहर डॅन्यूब नदीच्या काठी आहे. माझ्या मते या शहराचे, मला वाटणारे हेच आकर्षण आहे.
ऑस्ट्रियापासून निघून व्हिएन्नामधून ती नदी झेकोस्लोव्हाकियामध्ये येते. तिच्या काठचे तेथील हे पहिले शहर आहे. आता ज्या हॉटेलमध्ये बसून मी हे लिहीत आहे, तेथे समोर डॅन्यूब व तिच्यावर बांधलेला नवा पूल मला दिसतो आहे.