विदेश दर्शन - ८०

४१ ओटावा
२५ सप्टेंबर, १९७४

या प्रवासात मुंबई ते बेरूत उत्तम झोपलो. त्यामुळे सकाळी (लंडनच्या) ११ वाजता उतरलो तेव्हा पुष्कळच ताजातवाना होतो.

या खेपेस स्काय-लाइन या हॉटेलमध्ये एअर इंडियाने उतरविले होते. उत्तम गरम पाण्याचे स्नान घेतले व हायकमिशनर श्री. बी. के नेहरू यांची वाट पहात बसलो.

१२ च्या सुमारास ते आले. त्यानंतर पुरे पाच तास त्यांच्या संगतीत घालविले. ते स्वत: गाडी चालवीत होते. लंडनच्या बाहेर २५-३० मैलांवर टेम्स नदीच्या किनाऱ्यावरील एका छानदार रेस्टॉराँमध्ये लंच घेतले.

टेम्स, लंडन शहराच्या आवती-भोवती वळणे घेत हिंडते म्हटले तरी चालेल. दोन्ही किनारे बंदिस्त करून शेजारील जमिनीचा वापर-विकास-योजनाबध्द पध्दतीने केल्यामुळे नदीचे व किनाऱ्यावरील विभागाचे सौंदर्य व उपयुक्तता दोन्ही वाढली आहेत.

नदीत पाणी सतत वाहते रहाते. त्यामुळे छोटया छोटया किस्ती (बोटी) मध्ये मुलेबाळे घेऊन जाणारी, नदीवर आनंदाने विहार करणारी अनेक कुटुंबे दिसली. रविवार असल्यामुळे सर्व काही बंद. परंतु लोक मात्र सर्वार्थाने मुक्तांगणात भटकत होते म्हटले तरी चालेल.

नदीकिनाऱ्यावरील या बांधबंदिस्तीमुळे, मला मी महाराष्ट्रात असताना सुरू केलेल्या एका प्रयोगाची तीव्र आठवण झाली. पानशेतनंतर पुणे शहराच्या नदीकिनाऱ्याची या तऱ्हेने रचना, विकास करावा म्हणून एक कायदाही मी पास करून घेतला. परंतु मी महाराष्ट्र सोडून आलो आणि पाठीमागे या योजनेचेच पानशेत महाराष्ट्र-सरकारने केले.

कोलिनो आणि असल्याच कसल्यातरी योजनांचा विचार करण्याची कल्पनाशक्ती फक्त या लोकांमध्ये आहे. त्यांना ध्येयवादी दूरदृष्टी नाही, हे दुर्दैवाने मला आज दिसून आले.
 
कराड-नगराध्यक्षांनाही मी चीफ मिनिस्टर असताना कृष्णा-कोयनेची अशीच विकास-रचना करावी अशा अर्थाचे पत्र लिहिले होते. त्याचीही. या वेळी मला आठवण झाली. Sorry for the diversion!

श्री. बी. के. नेहरू यांच्या संगतीत हे पाच तास केव्हा गेले ते समजले नाही. लंचनंतर लंडनच्या परिसरातील गावे-उपनगरे पहात पहात पाच वाजले.