३६ नोवोसिबिर्रस्क (सैबेरिया)
यू. एस्. एस्. आर.
२७ जून, १९७४
मॉस्कोहून २५ तारखेला रात्री (?) ९ वाजता इकडे येण्यासाठी 'सोव्हीएटस्काया' हॉटेलमधून निघालो तेव्हा बाहेर झक्क संध्याकाळची उन्हे पडली होती. मावळतीकडे झुकलेला लाल लाल सूर्य डोळे भरून पहाण्याइतका सौम्य वाटत होता.
हल्ली इकडे दिवस मोठा - म्हणजे फारच मोठा आहे. अंधार १० चे पुढे पडतो. ४ चे सुमारास पुन्हा उजेड रात्री १०-४५ वाजता विमान मॉस्कोहून निघाले. पाच तास प्रवास करून येथे पोहोचलो तेव्हा सकाळचे ७-४५ झाले होते. ४ तासांचे अंतर आहे.
इतकी वर्षे सैबेरियासंबंधी ऐकले होते. वाचले होते. एकदा या भूमीवर येऊन पाहिले पाहिजे अशी तीव्र इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. अर्थात् हे शहर - दक्षिण सैबेरियात आहे. अगदी आक्टिकचे किनाऱ्यावर काय, कसे आहे त्याचा अंदाज येथे येऊन अर्थातच येणार नाही.
बारा लाख वस्तीचे शहर आहे. उद्योगधंद्यांचे केंद्र आहे. झकपकीत म्हणतात तसे शहर नाही. उद्योग वाढत आहेत - तसे वाढणारे शहर वाटले. अजून घरे होत आहेत. आहेत ती फंक्शनल आहेत. रस्ते बऱ्यापैकी - अधून मधून आपल्याकडे जशा दुरुस्त्या चालू असतात तशा चालू आहेत. वाहतुकीमध्ये माल-वाहतुकीचे ट्रक्स फार दिसले. म्हणजे कामसू शहर आहे. संपत्ती-उत्पादनाचे कार्यक्षेत्र वाटले.
सैबेरियातील अर्थातच हे सर्वात मोठे शहर आहे. सर्व आशियाभर पसरलेला हा सैबेरिया अनेक विभागांचा आहे. त्याचा हा एक विभाग आहे. हे सर्व सैबेरियाचे विभाग रशियन फेडरेशनमध्ये सामील आहेत. (म्हणजे सैबेरिया हा स्वतंत्र रिपब्लिक नाही.)
ट्रान्स सैबेरियन रेल्वे येथून पुढे जाते. सर्व लाइन विजेची केली आहे. मॉस्को ते नोवोसिबिर्रस्कला रेल्वेने ४८ तास लागतात. आणि सबंध सैबेरिया ओलांडण्यास ८ दिवस रेल्वेचा प्रवास करावा लागतो. या शहरामध्ये दोन तीन तरी विमानतळ असावेत.
गेल्या २५ वर्षांत हे शहर अधिक वाढले. अत्यंत योजनापूर्वक या प्रदेशाचा विकास चालू आहे. Massive univers lands केल्या आहेत. ऑइललँड्स्, आयर्न, डायमंड्स, कॉपर यांनी हा प्रदेश खच्चून भरला आहे.
या शहराच्या आवती भोवती असलेल्या तेलांच्या खाणींतून दरसाल १२० मिलियन टन तेल निघते. शेतीची जमीन - जी काही आम्ही विमानतळावरून शहारामध्ये २०-३० मैलांचा प्रवास करताना पाहिली - उत्तम काळीभोर आहे. मशागत झालेली दिसली. गव्हाचे पीक दिसले. ऑगस्टच्या मध्यावर कापणी असते. हिवाळयाची चाहूल लागण्यापूर्वी पीक हाती यावे अशी योजना असावी.
या विभागात पिकाखाली येण्यासारखी जमीन ४० लाख एकर आहे. लोकसंख्या सर्व २०-२२ लाख लोकांची. त्यांपैकी ७० टक्के शहरवासी. बाकी ३० टक्के शेती व तत्सम कार्यात, ग्रामीण भागात अशी वाटणी आहे.
येथे पोहोचताच या विभागाच्या कमिटीचे प्रमुख स्वागतास हजर होते. त्यांनी अगत्याने शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सेंटोइट हॉटेलमध्ये नेले. जुन्या पध्दतीचे हॉटेल आहे. परंतु व्यवस्था उत्तम. बैठकीचा मोठासा हॉल, बेडरूम तशीच प्रशस्त. मोठया काचेच्या बंदिस्त खिडक्या. उजेड भरपूर. गालीचा भक्कम पण उत्तमपैकी (नाजूक नव्हेत).
हॉटेलच्या समोर शहराच्या मध्यवर्ती, चौक आहे. वाहतुक एकसारखी असते. चौकाच्या पलीकडे लेनिनचा भव्य पुतळा आहे. त्याच्या पाठीमागे सुरेख डोम असलेली एक विशाल, नव्या तऱ्हेची इमारत आहे.