विदेश दर्शन - ७

त्याचं असं झालं की-

एक-दोन पावसाळे उलटले असतील!

मार्च-एप्रिलचा सुमार असावा. मोकळा वेळ होता. दुपारी माझं कपाट आवरत बसलो होतो. अवचित ती भेट माझ्या हाती आली!

क्षणभरच विचार करावा लागला. यशवंतराव चव्हाण- त्यांना आम्ही मंडळी साहेब म्हणत असू - यांनी माझ्या षष्टयब्दिपूर्तीनिमित्त मला ती भेट दिली होती. भेट देताना म्हणाले होते, ''रामभाऊ, अभिष्टचिंतन वगैरे बाकीचं सारं लौकिक होतं ते झालं. आता ही माझी वैयक्तिक भेट घ्या. तुम्हाला आवडेल. घरी गेल्यावर सावकाशीनं पहा.''

भेटीचा मी स्वीकार केला. घरी आल्यावर कपाटात ठेवली. त्या वेळी मी एका महत्त्वाच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतलं होतं. कुटुंबियांसमवेत भेट सावकाशीनं पाहावी म्हणून कपाटात ठेवली. पण अशी सावकाशी लगोलग मिळाली नाही. मी एका अपघातात सापडलो. महिनाभर हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं. नित्यक्रम सुरू होण्यास दोन-तीन महिने लागले. भेट कपाटात राहिली. काही पावसाळे गेले!

आता कपाट आवरताना भेट हाती येताच स्मृति जागी झाली. भेट तरी काय आहे असा विचार करीत वेष्टण सोडले. पहातो तो समोर यशवंतरावांचे हस्ताक्षर! 'प्रिय सौ. वेणूबाईस' असा मायना असलेलं यशवंतरावांनी लिहिलेलं पत्र-वाङमय!

'अरेरे!....., उद्गार अनाहूतपणे बाहेर पडले. प्रसंग आठवला. मन गहिवरले. तो प्रसंग मला जसाच्या तसा दिसू लागला. सौ. वेणूताई चव्हाण यांचं १९८३ च्या जूनच्या प्रारंभी देहावसान झालं. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी त्यांचं चरित्र लिहिण्याविषयी चर्चा सुरू झाली. चरित्र-लेखनाची अवघड जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली.

सौ. वेणूताईंच्या जीवनाचा तपशील मिळवावा, यासाठी १९८३ च्या डिसेंबरअखेरीस दिल्लीस गेलो. तीन आठवडे राहिलो. '१ रेसकोर्स रोड' या त्यांच्या निवासस्थानी यशवंतराव व मी दोघेच होतो. वेणूताईंचे निधन आणि त्यातून निर्माण झालेला एकाकीपणा....ते मनानं हलले होते.

त्या तीन आठवडयांत खूप खूप बोललो - म्हणजे चर्चा केली. तपशील जमा झाला. तरीपण वेणूताईंचा काही पत्रव्यवहार असेल तर तो अभ्यासावा अशी मी इच्छा प्रदर्शित केली. त्या वेळचा तो प्रसंग...