विदेश दर्शन - ३

त्या डोंगरकपारीत असंख्य लेणी आहेत. अजिंठा-वेरूळची आठवण येते. भारत-अफगाण-सरकारांच्या साहाय्याने हे अवशेष सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणून गेली काही वर्षे तज्ज्ञांमार्फत प्रयत्न चालू आहेत. मोगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांची कबर येथे आहे. तीच मी पाहणार आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील विभागात राहणाऱ्या एका जमातीचे लोक उत्तम घोडेस्वार आहेत. ते अनेक धाडसी प्रयोग करतात. त्यांची येथे स्पर्धा आहे, तीही पाहणार आहे.''

''बामीयानच्या खोऱ्यात चेंगीझखानाच्या क्रौर्यांचे काही अवशेष पाहिले. बुध्दमूर्तीच्या खालच्या बाजूला एका उंच टेकडीवर एक शहर होते. चेंगीझखानाने त्या शहराचा संपूर्ण विध्वंस केला. स्त्री, पुरुष, मुले या सर्वांचा संहार केला. आताही हे शहर उद्ध्वस्त स्वरूपात अमानुष क्रौर्याची साक्ष देत उभे आहे.

करूणेची मूर्ती भगवान बुध्दही उभे आहेत आणि चेंगीझखानाचे क्रौर्यही शेजारीच उभे आहे. इतिहासात क्रौर्य आणि करुणा यांची जणूकाही स्पर्धाच चालू आहे. कुणाचा विजय होत आहे? करूणेचा की क्रौर्याचा? मन कधीकधी साशंक होते. आजच्या जगाकडे पाहिले की हा प्रश्न भेडसावू लागतो. मानवाची प्रगती होत आहे, असा आमचा दावा आहे. हा खरा असेल तर करूणेचाच विजय होतो आहे असे मानावे लागेल. पण अण्वस्त्रांच्या रूपाने आधुनिक चेंगीझखानाचे क्रौर्य उभे आहे. याची जाणीव झाली की पुन्हा मन अस्वस्थ होते आणि साशंक बनते. अर्थात् पुरुषार्थ करणारांनी करुणेचा मार्ग पत्करला पाहिजे. याच श्रध्देने मी आज बामीयानहून परतलो'' (काबूल, ३१ ऑक्टोबर, १९७५ - हॉटेल इन्टरकॉन्टिनेन्टल).

इंडोनेशियातील बाली बेटाला यशवंतरावांनी भेट दिली होती. या बेटावर पंधराशे वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती अवतरली. ती संस्कृती आजही आपल्यापरी परंपरेचे सामर्थ्य सांभाळून तेथे नांदत आहे.

यशवंतराव लिहितात - ''वर्षांनुवर्षें ज्यासंबंधी वाचले. ऐकले ते बाली बेट आज पाहिले. दुपारी सव्वाअकराला जकार्ताहून निघालो. दुपारचे जेवण विमानातच घेतले. दीड तासात येथे पोचलो. विदेशमंत्री- डॉ. आदम मलीक, आज त्यांचा वाढदिवस असतानाही या ट्रीपवर आमच्या बरोबर आलेले आहेत. मी बाली बेटावर हिंदू संस्कृती पहावी, असा त्यांचा आग्रह गेल्या वर्षांपासून होता. विमानतळावर उतरताना अगदी बाली-हिंदू पध्दतीप्रमाणे स्वागत झाले.

दोन तरुण, महाभारतकालीन हिंदूंचा पेहराव असावा, तसा अंगावर धारण करून आगतस्वागत करण्यासाठी हातात छत्रचामरे घेऊन आले. त्याचप्रमाणे दोन प्रौढ तरूणी पुष्पमाला हाती धरून सामोऱ्या आल्या. कपाळावर कुंकू, गौरवर्णाकडे झुकणारी कांती, हिंदू विनम्रता-क्षणभर सर्व काही अगदी महाभारतकालीन वातावरण असल्यासारखे वाटले. या बाली स्टाइल स्वागतानंतर बाली बीच हॉटेलात आलो. सुरेख बीच आहे.

माझ्या खोलीच्या गच्चीत गेल्यावर पूर्व दिशेला पसरलेला जावा समुद्र दिसला. क्षितिजावर अंधुकसे एक बेट व त्याच्यावरचे डोंगररांगांचे आकार दिसत होते. सुमद्राचे पाणी शांत व स्वच्छ दिसले. उद्या सकाळी सूर्योंदयाचे आत या समुद्रकाठच्या चौपाटीवर अनवाणी चालण्याचा विचार आहे. बाली बेटावरची समुद्राची रेती उघडया पायतळाला लागावी, अशी इच्छा आहे. या भूमीवर नम्रतापूर्वक असेच चालले पाहिजे. हा हिंदूंचा मुलुख आहे. मी हे हिंदुत्ववादाच्या भावनेने नाही म्हणत-पण अजूनही येथे लाखो हिंदू, परंपरागत कथांच्या आधारे चालत आलेली हिंदू संस्कृती जपत आहेत हे पाहिले. चारच्या सुमारास बाहेर पडून एका हिंदू कुटुंबाचे, कुटुंबाने चालवलेले हॅण्डिक्राफ्ट्सचे कार्य पाहिले. त्याने घराची आखणी दाखवली. ही परंपरागत आहे. घराला दरवाजा आहे. आत जाताच मोकळे अंगण. ईशान्येच्या बाजूला मंदिर. सामान्यत: सुखवस्तु हिंदू तसेच आहेत. हिंदू संस्कृती जातपातीचा वारसा येथेही घेऊन आली.