विदेश दर्शन - ४

''पण बेट फार सुंदर आहे. केरळ कोकणासारखी गर्द झाडी. जमीन उत्तम म्हणून शेती उत्तम. हे लोक अतिशय उद्योगी आहेत. नटलेला निसर्ग इतका विपुल की, नृत्य, नाटय, चित्रकला या कला शतकानुशतके पोसल्या गेल्या त्यात काय आश्चर्य!'' (बाली. इंडोनेशिया, २२ जुलै १९७६.)

''सकाळी बालीहून निघण्यापूर्वी एक कलाकेंद्र पाहिले. नानाविध लाकडांच्या कोरलेल्या मूर्ती होत्या. पारंपरिक व आधुनिक यांचे मिश्रण या संग्रहात आहे. उभ्या नाचणाऱ्या श्रीगणेशाची मूर्ती ही मला नवीन वाटली. मूर्ती आकर्षक होती. आणखी एक नवेपण या मूर्तीत पाहिले. शंकराच्या गळयात जसा सर्प असतो तसा सर्प या गणेशाच्या कमरेला वेटाळून होता.

बाली हिंदूंमध्ये त्याच कथा- रामायणातल्या व महाभारतातील- काहीशा फरकाने सांगतात. कर्मसिध्दांत व गीतेवर फार विश्वास. बालीतील हिंदू कर्मयोगाचे तत्त्व आचरणात आणतो, असे एक वरिष्ठ हिंदू अधिकारी सांगत होता. लोक उद्योगी व आनंदी आहेत त्याचे रहस्य त्यात आहे, असे त्याचे मत. गाईचे स्थान येथील हिंदूंच्यात, विचार-आचारात काय आहे, हे मी मुद्दाम समजून घेण्यासाठी विचारले. त्या गृहस्थाने सांगितले की आम्ही गायी पाळतो, पण ते त्यांच्या दुभत्यासाठी आणि बैलांसाठी. ब्राह्मण सोडून बाकी सर्व हिंदू गोमांसभक्षक आहेत व त्यात काही गैर वा अधार्मिक आहे, असे ते मानत नाहीत.''

''दुपारी साडेअकराला जोगी आकार्ता या शहरात पोचलो. दोन नंतर येथून ३० मैलांवर बोरोबुदुर हे विश्वविख्यात बुध्दमंदिर आहे, ते पाहण्यासाठी गेलो. हे मंदिर जगातील सर्वात मोठे बुध्दमंदिर आहे. नवव्या शतकात, म्हणजे एक सहस्त्र वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. मंदिराची रचना शिल्प म्हणून व बुध्दतत्त्वज्ञानाचे प्रतीक म्हणूनसुध्दा अपूर्व आहे. एकशेवीस गज लांब, रूंद व तितकेच उंच ही लांबीरुंदी पायाशी आहे. पण पुढे ती निमुळती होत जाते. शिखराचे जागी मोठे गोल स्तूप आहेत.

पूर्वेकडील प्रवेशद्वार प्रमुख आहे. त्यातून प्रवेश करावयाचा. जसजसे आपण वर जातो, तसे प्रदक्षिणा घालता येईल अशी व्यवस्था वेगवेगळया उंचीच्या स्तरांवर केलेली आहे, असे आढळून येते. जसजशी मंदिराची उंची चढत जाते, तसतशी आध्यात्मिक अनुभवाचीही उंची वाढते, असे दिग्दर्शित केले आहे. हे व्यक्त करण्यासाठी भगवान बुध्दाच्या मूर्तीच्या मुद्रांचा उपयोग केला आहे. अशा तऱ्हेने बुध्दाच्या पाचशेसाठ मूर्ती सर्व मंदिरावर प्रतिष्ठित केल्या आहेत. मूर्तीच्या ओठांवरील नित्य ओळखीचे ते सौम्य हास्य व ज्ञानी पुरूषाचे शालीन डोळे आजही तसेच दिसतात. मनाला कसल्यातरी तृप्तीचा आनंद होतो.

आज दिवसभर या मंदिराने भारून गेलो आहे. आशियाखंडातील पुरातन संस्कृतीचे हे अवशेष पाहिले म्हणजे माणूस भारून गेला नाही, तरच आश्चर्य! वेरूळ-अजिंठयाची आठवण झाली. तेथील रूपसंपन्न चित्रकला, शिल्प व विविध भव्य भाव दाखविणारी बुध्दाची अविस्मरणीय मूर्ती यांच्या संगतीला बोरोबुदुरची जोड मिळाली.'' (जोगी अकार्ता- २३ जुलै १९७६.)

संयुक्त राष्ट्रे या जागतिक संस्थेशी यशवंतरावांचे वारंवार संबंध आले. या संस्थेत जगातील शेकडो राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची सगळीच भाषणे मुद्देसूद व आंतराराष्ट्रीय राजकारणामध्ये सामंजस्य स्थापन करण्याच्या उदात्त उद्देशाने प्रेरित अशी झाली.