विदेश दर्शन - ९

''वाचून पहा, हे काहीसं वेगळंच आहे.'' यशवंतरावांनी सांगितलं.

दिल्लीतल्या मुक्कामात मी ते सविस्तर वाचलं. काळजीपूर्वक वाचलं. वेणूताईंना समोर ठेवून त्यांनी सर्व लिहिलं होतं. जगातील विविध राष्ट्रांचा प्रवास करीत असतांना सातासमुद्रापलीकडून पत्नीशी पत्ररूपानं त्यांनी जे सविस्तर संभाषण केलं ते हे लेखन. तरी पण केवळ पति-पत्नीमधील पत्रे एवढयापुरतेच लेखनाचे स्वरूप मर्यादित नाही. त्यामध्ये जगाचे सूक्ष्म निरीक्षण आणि मूलभूत व्यासंगी चिंतन असल्याची जाणीव प्रत्येक पत्रवाचनाबरोबर होत राहिली. मी माझी प्रतिक्रिया सांगितली. त्यांचीही ऐकली. तो विषय तेवढयावरच थांबवला. वेणूताईंना समोर ठेवून ते सर्व लिहिलेलं होतं आणि त्या निघून गेल्याच्या दु:खातून अजून ते सावरले नव्हते. कपाट खुलं करण्याच्या वेळचा प्रसंग माझ्यासमोर घडला होता. ताजा होता. चर्चा थांबवली ती त्यामुळे.

लिहिलेलं सर्व ज्या क्षणाला त्यांनी प्रथम पाहिलं त्याच क्षणाला मलाही दर्शन घडलं. वाचण्याची संधी मिळाली. प्रतिक्रिया व्यक्त करता आली. त्यांचं भाष्य ऐकायला मिळालं. या समाधानात मी दिल्लीहून परतलो. १९८४ च्या जानेवारीच्या मध्यावर.

त्याच वर्षी, म्हणजे १९८४ च्या ७ फेब्रुवारीला, कराड शहरवासियांनी तेथील नगरपालिका, शिक्षणसंस्थांनी माझ्या षष्टब्दिपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतनाचा एक कार्यक्रम आयोजित केला. कराडच्या शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नारायणराव शिंदे यांना राज्यपुरस्कार मिळाला होता. त्यासाठी त्यांचा गौरव आणि माझे अभिष्टचिंतन असा संयुक्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे होते यशवंतराव चव्हाण. कराडकरांनी हा कार्यक्रम मोठा दर्जेदारपणानं केला.

त्यानंतर दिल्लीला परतीच्या वाटेवर यशवंतराव पुणे येथे आले. त्यांनी माझं व्यक्तिगत अभिष्टचिंतन केलं आणि 'वैयक्तिक भेट' दिली.

आता एक-दोन पावसाळे उलटल्यानंतर ती भेट आणि त्यांचं हस्ताक्षर समोर दिसताच सारं सारं आठवलं. यशवंतराव कोचावर बसले आहेत...भेट माझ्या हाती देत आहेत...त्यांचे ते शब्द...लौकिक होतं ते झालं... आता ही माझी वैयक्तिक भेट घ्या. तुम्हाला आवडेल...क्षणभर सारं सारं समोर उभं राहिलं.

त्यांनी 'लौकिक' हा शब्द वापरला होता तो कराड येथे झालेल्या समारंभाला उद्देशून! या लौकिकाच्या पलीकडलं, वैयक्तिक असं भेट देण्यासाठी त्यांनी आपली निवड केली याचं समाधान होतं.

हे समाधान आणि त्याचा आनंद व्यक्त करावा अशी मन:स्थिती मात्र उरली नव्हती. या समाधानाला, आनंदाला दु:खाची किनार होती. दु:ख अशासाठी की या अलौकिक भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशवंतराव हयात नव्हते! हे सारं मनात सामावून घेणं कठीण झालं!