विदेश दर्शन - २

उदा., जागतिक बँकेचे व अमेरिकेचे एकवेळचे अर्थसचिव मॅक्नामारा यांच्याशी त्यांनी परिचय करून घेतला. वारंवार भेटी होऊन त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. हीच गोष्ट अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पट्टीचे मुत्सद्दी किसिंजर यांच्या संबंधात लक्षात येते.

आशिया, आफ्रिका, विकसनशील देश व विकसित देश यांचे मौलिक प्रश्न सुटण्यासारखे कोणते आणि न सुटण्यासारखे कोणते, याच्या चिकित्सेत यशवंतराव गढून जातात, आणि त्याचे सखोल विवेचन करतात. निकोशियाच्या कॉमनवेल्थ अर्थमंत्र्यांच्या परिषदेसंबंधी यशवंतरावांनी जे विवेचन केले आहे ते या संदर्भात अत्यंत वाचनीय झाले आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थलांचे दर्शन यशवंतराव घेतात तेव्हा समोर जे त्यांना दिसत असते, त्यापेक्षा भूतकाळात जे घडलेले असते, ते उठावदारपणे त्यांच्या मन:चक्षूंपुढे त्याच वेळी उभे राहते. उदा., त्यांनी भेट दिलेली, आठव्या हेन्रीचा राजवाडा आणि पॅरिसजवळील व्हर्सायचा राजमहाल ही प्रवाशांची अत्यंत महत्त्वाची आकर्षणे होत.

हेन्रीच्या राजवाडयासंबंधी यशवंतराव लिहितात, ''पंधराव्या शतकातील आठवे हेन्री म्हणजे एक विलक्षण प्रकरण होते. अनेक लग्ने केली, अनेकांच्या मिळकती हडपल्या, हॅम्पटन कोर्ट त्यांपैकीच. या राजाची लहर लागली की जो मनुष्य मर्जीतून उतरे, त्याची वास्तू आपलीशी करीत असे. मोठमोठी आणि पाठोपाठ अशी तीन प्रांगणे. एक कलापूर्ण दिवाणखाना, जुनी पाचशे वर्षांपूर्वीची अजूनही रेखीवपणे राखलेली सुंदर बाग, जुन्या चित्रकारांनी काढलेल्या कलाकृती व जुन्या शस्त्रांनी सजवलेल्या राजवाडयाच्या भिंती, ही सर्व मला वैशिष्टयपूर्ण वाटली.''

ज्या विदेशातील नगरीशी भारतीय संस्कृतीचा इतिहास निगडित झालेला असतो, त्या नगरीबद्दल त्यांचे विवेचन वास्तववादी असले तरी अत्यंत भावपूर्ण असे असते. याची अनेक उदाहरणे या पत्रसंग्रहात मिळतात. इंडोनेशिया आणि काबूल यांची माहिती भावनांनी भरलेली आणि इतिहासाने परिणामकारक व उठावदार बनली आहे.

काबूलबद्दल त्यांची भावना अधिक गंभीर आणि उत्कट बनते. ते लिहितात - ''दहा लाख वस्तीचे हे शहर विस्तृत पसरलेले आहे. नवे विभाग आधुनिक बनत आहेत. जुने काबूल तसेच जुने आहे. संध्याकाळी इंटरकॉन्टिनेन्टलच्या खैबर सूटमधून काबूल शहर पाहिले. एक विलक्षण शांत, सुंदर, मनोहारी दृश्य दिसते.

''भारतीय क्लासिकल संगीत येथे लोकप्रिय आहे. आपल्यासारख्या बैठकी येथे रंगतात. अफगाण गायक श्री. सारंग याचे गायन मी आलो त्या रात्रीच्या जेवणानंतर विदेश-मंत्रालयाने ठेवले होते. बडे गुलाम अलीची आठवण झाली. सुरावट तीच. आरोह-अवरोहाचे नखरे तेच, देहयष्टीही तशीच.''

''आज सकाळी सरकारी छोटया विमानाने 'बामीयान'ला गेलो होतो. तेथे पंधराशे ते सोळाशे वर्षांपूर्वीचे भगवान बुध्दाचे दोन भव्य पुतळे डोंगरकपारीत कोरलेले आहेत. कुशाण राजवंशाने बुध्द धर्माचा येथे प्रसार केला. तेव्हाचे हे सांस्कृतिक लेणे आहे. दोन मूर्ती आहेत. एक १५० ते १६० फूट उंचीची व दुसरी असेल शंभर फूट उंचीची.