संध्याकाळी ७ वाजता अंकाराला पोहोचलो. उत्तम स्वागत. टर्कीचे विदेशमंत्रि श्री. चलायांजिल आणि इतर डिग्नेटरीज् होते. अंकारा शहरातील भारतीय स्त्री-पुरुष अगत्याने आले होते. उशीरा पोहोचल्यामुळे सरकारी खाना ८ चा ९ वाजता केला होता. त्यामुळे सोय झाली.
विदेशमंत्र्यांच्या घरी जेवण होते. त्यांचे ज्येष्ठ सहकारी मंत्रि, रक्षामंत्रि, वित्तमंत्रि, ऊर्जामंत्रि वगैरे होते. जेवणाचे प्रकार आपल्या सारखेच होते. कबाब, पिलाऊ, मटर भाजी, इकडचा मासा - परंतु करण्याची पध्दत आपल्यासारखीच वाटली. स्वागतपर भाषणे झाली. चर्चावजा गोष्टी झाल्या.
बांगला देश, पाकिस्तान, आर्थिक स्थिती, हिंदी महासागर - भुत्तो, श्रीमति इंदिरा गांधी, महात्मा गांधी, कमाल अतातुर्क असे विषय होते.
मी इतकी विविध पण महत्त्वाची खाती गेल्या १४ वर्षांत सांभाळली, त्याची चर्चा त्यांनी काढली. हा प्रश्न मला नेहमीच विचारतात की, ''यांतले कोणते तुम्हाला आवडले वा कोणते महत्त्वाचे आहे?'' मला कधीच याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. मी विनोद करून प्रश्न निभावून नेतो एवढेच.
हॉटेलमध्ये परत आलो तेव्हा तेथील रात्रीचा एक वाजला होता; म्हणजे दिल्लीचे साडेतीन. आजचा दिवस, २१ तास एकसारखा जागून कामात - वाचनात - प्रवासात - जेवणात - चर्चेत गेला. फार थकून गेलो. सकाळी ७ वाजता उठल्याशिवाय वेळेवर काम सुरू होणार नाही ही चिंता करीत झोपी गेलो. पण सहा तास झोप चांगली मिळाली.