७६ अंकारा
१ एप्रिल, १९७६
राजदूत श्री. एन्. बी. मेनन सकाळी ८ वाजता आले. तासभर दोन दिवसांच्या चर्चेची धोरणे आखली. ९॥ वाजता अतातुर्कच्या स्मारकास अभिवादनास गेलो. आपल्याकडे जसे पाहुणे राजघाटावर गांधीजींना पुष्पचक्र वाहतात तसे. गंभीर समारंभ असतो. हे एक भव्य व विस्तीर्ण स्मारक आहे. खूप अंतर व बऱ्याचशा पायऱ्या चालाव्या, चढाव्या लागतात. तेथेच अतातुर्कच्या खाजगी वस्तूंचे वगैरे म्युझियम आहे.
१० वाजता विदेश-मंत्रालयात एक तासभर स्वतंत्र चर्चा. फक्त श्री. चलयांजिल व इंटरप्रिटर असे आम्ही तिघेच होतो. तो स्पष्ट बोलला. यामध्ये आग्रहाने बोलविण्याच्या पाठीमागचे उद्देश समजले. काहीच अनपेक्षित नव्हते.
त्यांचे प्रमुख उद्देश नॉन-अलाइन समिटला गेस्ट म्हणून हजर राहावयाचे आहे. सायप्रसबाबत आम्ही रिझनेबल धोरण घेत आहोत असे ते मानतात. पण त्यांचा प्रश्न अधिक समजून घेऊन त्यांना पाठिंबा, शक्ती द्यावी.
नॉन-अलायनमेंटचे ते पहिल्यापासून मोठे विरोधक व टीकाकार पण आता ते त्याची सहानुभूती चाहतात. संबंध-सहयोग अधिक वाढावा ही इच्छा.
ते नुकतेच अमेरिकेची बंद झालेली शस्त्रास्त्र-मदत पुन्हा सुरू करण्याचे करार करून परतले आहेत. त्याची हकिगत सांगत होते. ज्या Geo-political frame work मध्ये ते आहेत, त्यामध्ये नाटो, यू. एस्. ए. यांचेशी असलेले करार चालू ठेवण्याखेरीज गत्यंतरच नाही. हेलेसिंकीला त्यांचा पाठिंबा आहे. यू. एस्. एस्. आर. Bilateral सहकार्य समजुतीने वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
आजच्या जागतिक शक्तींचा तो चक्रव्यूह आहे त्यात एक सुपर पॉवरशी संबंध वा करार असणे ही राष्ट्रीय संरक्षणाची हमी ठरत नाही असे मात्र टर्कीला हल्ली वाटू लागले आहे. आणि म्हणून धोरणाची ही दिशा ठरत आहे असे त्यांचे समर्थन.
नकाशावर सायप्रसची स्थिती व महत्त्व त्यांच्या देशाला का आहे ते त्यांनी सांगितले. 'एजियन सी' मध्ये टर्कीच्या किनाऱ्याला लागून असलेल्या बेटासह सर्व बेटांवर ग्रीकची मालकी असून समुद्रात सर्वत्र त्यांची नाकेबंदी झाली आहे. सायप्रस हेच एक त्यांना भूमध्य समुद्रातील 'ओपनिंग' आहे.
नंतर आम्ही ऑफिशयल ग्रुपमध्ये गेलो. त्यांच्या प्राथमिक स्वागतानंतर मी आमच्या धोरणाची मूलतत्त्वे व आमची विदेशनीति तत्त्वप्रधान कशी आहे हे सांगितले. टर्कीची मैत्री वाढवावी अशी आमचीही इच्छा आहे. बिग् पॉवरशी आमचे संबंध कसे व का आहेत आणि आमच्या रिजनमध्ये सहकार्य व मैत्री हे ध्येय बायलॅटरियन मधूनच आम्ही कसे वाढवू इच्छितो हे सांगितले. श्रीलंका, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान वगैरे देशांची उदाहरणे दिली. पाकिस्तानसंबंधी विषय-प्रवेश केला आणि आजच्या चर्चेची वेळ संपली. (हेरकथेच्या निवेदनासारखे झाले. सर्व कथा सांगता सांगता गुन्हेगार सुरा घेऊन धावला आणि पुढची कथा पुढच्या प्रकरणात सुरू करू असे म्हणण्यासारखे झाले.) आता पाकिस्तानचे विश्लेषण उद्या असे मी म्हणताच सर्वजण मनापासून हसले.