विदेश दर्शन - १४६

७४ रोम
१९ डिसेंबर, १९७५

पाच दिवस पॅरिसमध्ये राहूनही लिहीन म्हटले तरी वेळ मिळाला नाही. काल सकाळी १०॥ वाजता सुरू झालेली मीटिंग आज पहाटे ५ वाजता संपली. (लंच-डिनरसाठी जो काही थोडा वेळ मिळाला तो सोडून).

दुपारी १ वाजता पॅरिस सोडले व येथे ३ वाजता पोहोचलो. उमेद आणि वेळापत्रक होते की, ६॥ वाजता आम्ही येथून मुंबईला निघू. परंतु आता रात्रीचे ११ वाजलेत, आम्ही येथून केव्हा निघणार हे मलाच माहिती नाही.

एअर-इंडियावाले कधी १२ तर कधी २ आणि ३ वाजता रात्री जाता येईल असे निरोप पाठवीत आहेत. यांचे विमान लंडनहून निघणार आहे म्हणे!

परदेशात विमानांच्या या अनियमित आणि अनिश्चितपणाचा एवढा मन:स्ताप होतो की सांगता सोय नाही. धड मी पॅरिसमध्ये नाही नि धड मुंबईच्या वाटेवर नाही. मधेच रोममध्ये हॉटेलमध्ये पडून आहे. येथे एअर-इंडियाचे काही पायलट्स् आहेत. चांगली माणसे आहेत. माझा वेळ जाईना म्हणून आग्रहाने जेवायला घेऊन गेले. पण माझे कशातच मन नाही. मुळात कार्यक्रम ठरविताना आम्ही शहाणपणा दाखविला नाही असेच म्हणावे लागेल.

पॅरिसची कॉन्फरन्स बऱ्याच ओढाताणीनंतर आज संपली. मुळातच अवघड होती. दोन्ही बाजूंमध्ये (डेव्हलपिंग अॅण्ड डेव्हलप्ड) आर्थिक प्रश्नावर, प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या निर्धाराने संवाद सुरू झाला पाहिजे हा हेतू आहे. संवाद निदान सुरू तरी झाला पाहिजे पण तो सुरू होण्यातच बऱ्याच अडचणी आहेत. प्राथमिक अडचणी दूर झाल्यासारखे दिसते आहे.

चार कमिशन्स तयार झाली आहेत. हिंदुस्थानने यापैकी तीन कमिशन्सचे सदस्यपद मिळविले आहे. opec वाले खरी गडबड करीत आहेत. लटपटी करून त्यांनी तीन को-चेअरमनशिप्स मिळविल्या आणि पुन्हा चर्चेत अडथळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहेच. पुढारलेल्या देशांना ही चर्चा टाळता आली तर टाळावयाची आहे. त्यांना त्याची घाई नाही. यू. एस्. ए. ला तर ती नकोच आहे. खरी गरज आहे ती लहान-मोठे आमच्यासारखे जे देश आहेत त्यांना! अशी ही परिषद झाली.

परिषदेच्या निमित्ताने बरेच लोक भेटले. किसिंजर, ई. ई. सी.* चे प्रेसिडेंट ऑर्टेली, पाकिस्तानचे अझीझ अहमद, यू. के. चे कॅलहॅन, नायजेरिया, युगोस्लाव्हिया, झांबिया, झाएर, फ्रान्स वगैरे देशांचे परराष्ट्रमंत्रि भेटले. परिषदेव्यतिरिक्त इतर उपयुक्त चर्चा झाल्या.
------------------------------------------------------------------------------
* European Economic Community (E.E.C.)
-------------------------------------------------------------------------------
डॉ. किसिंजर नेहमीप्रमाणेच मैत्रीपूर्ण व मोकळे होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मात्र साखरपेरणी करीत होते. या परिषदेपूर्वी ते आपल्या आई-वडिलांसह त्यांच्या जर्मनीमधील मूळ गावी जाऊन आले होते. त्यांचा तेथे मोठा सत्कार झाला. तेथील समारंभात आई-वडिलांसह काढलेले फोटो बरोबर होते. परिषदेमध्ये आम्ही शेजारी शेजारी होतो. तेव्हा अभिमानाने आपल्या वडिलांचा फोटो दाखवून म्हणाले, ''पाहिलेत हे माझे वडील. ८८ वर्षांचे आहेत. ते उत्तम शिक्षक होते.''