विदेश दर्शन - १५३

मघा जेथे सूर्याची लाल कोर बुडताना पाहिली त्याच्या बरोबर वर-क्षितिजापासून काहीशा उंचीवर चंद्राची बीजेची कोर मंद तेजाने उगवली होती. तिच्या बाजूला थोडया अंतरावर (म्हणजे कित्येक कोटी मैल) एकच एक चांदणी लुकलुकत होती. सगळे आकाश स्वच्छ होते. इतर चांदण्यांचा मागमूसही नव्हता.

खाली पाहिले तर - धावणाऱ्या मोटारींच्या प्रकाशझोतांची रांगच रांग. रस्ते प्रकाशमान होते. दिवसा तिथून दिसणारा डिफेन्स मिनिस्ट्रीच्या इमारतीचा आखीव-रेखीव समूह अंधारामुळे अस्पष्ट झाला होता. उजव्या बाजूला मशिदीचे मिनार काहीसे धूसर पण सरळ रेषेत उंच उभे होते.

मी मागे फिरलो. सर्व खोल्यांतील दिवे बंद केले आणि अंधारात, त्या दरबारी खोल्यातील सजावटीकडे पाठ करून चंद्राची ती कोर आणि साथीची ती चांदणी एकसारखा टक लावून डोळे भरून पहात राहिलो.

किती वेळ गेला कोण जाणे. दारावर थाप पडल्यासारखे वाटले. जेवणाची वेळ झाली होती. मी होस्ट होतो. कसेतरी जुलमाने तिथून पाय काढले आणि फॉरमॅलिटिज् सुरू झाल्या. जेवण अकरा वाजेपर्यंत चालले होते.

परत येऊन पहातो तो बीजेची ती कोर आणि चांदणी, या तिथे दिसत नव्हत्या. सृष्टीक्रमाने त्यांनाही मावळवले होते. आता मात्र आकाशात इतर बऱ्याच चांदण्या इतस्तत: चमकताना दिसत होत्या. खरे म्हणजे यात तसे काही नवीन नव्हते. पण आज तरी ही एकच गोष्ट परत परत मनात येत राहिली. याचाच विचार करीत झोपी गेलो.