लोकशाहीची गाडी बेफाट वेगाने धावू लागली आणि स्वयंनियंत्रणाची आशा दिसेनाशी होऊन गाडी भयानक अपघातात सापडून लोकशाहीच्या विनाशाखेरीज दुसरा मार्ग दिसत नाही, तेव्हा 'ब्रेक' म्हणून वापरण्यासाठी आमच्या घटनेने आम्हाला साधन दिले आहे. हा आत्मविश्वास या प्रसंगाने भारतीय जनतेला दिला आहे वगैरे.
नेहमीप्रमाणे पाकिस्तान आलेच. 'तुम्ही मित्र शस्त्रास्त्रे देऊन त्यांना बेफाम करू नका म्हणजे आमचा समझोता लवकर होईल.' असे मी त्यांना हसत हसत पण स्पष्टपणे सांगून टाकले.
नंतर लगेच प्रसिडेंटना भेटलो. सत्तरीच्या वरचे ज्येष्ठ गृहस्थ होते. आपण 'अर्ली-फिफ्टीज' मध्ये राजदूत असताना श्री. के. पी. एस्. मेनन भारताचे प्रतिनिधी होते. त्यांची आपली ओळख कशी होती वगैरे, म्हातारी माणसे जुन्या गोष्टी सांगतात तशी सुरुवात करून आजचे तुर्कस्तानचे जे प्रश्न आहेत त्यासंबंधी बोलले.
आर्चबिशप मकॉरिएस हे त्यांच्या (म्हणजे सर्वांच्याच) टीकेचे निशाण होते. राजदूतांनी कसे काम करावे हे आपल्या अनुभवाचे काही विचार सांगितले. अगदी शिक्षकी थाटात. त्यामुळे थोडी मजा आली. टर्की व भारतीय, दोन्ही राजदूत हजर होते. मी मजेने म्हटले, 'प्रेसिडेंट साहेब, आपला उपदेश दोघेही राजदूत मोठया लक्षपूर्वक ऐकत आहेत. मला आशा आहे की, ते आपल्या इतर सहकाऱ्यांशी याची देवाण-घेवाण करतील.'
चर्चेत फार खोली येऊ शकली नाही. पण गांभीर्य व उच्चपदाचा दर्जा त्यात होता. तेथून मी हॉटेलकडे परतलो.
दिवसभर गर्दी व धावपळ होती. ६॥ वाजून गेले होते. रात्री मी देणार असणाऱ्या जेवणाला चांगला दीड तास अवकाश होता. म्हणून बिछान्यावर पडून राहिलो.
हॉटेलमधल्या या राजेशाही सूटमध्ये माझी झोपण्याची खोली पश्चिमेकडे आहे. उजेड व्हावा म्हणून पडदे दूर करून लांब-रुंद काचेने बंदिस्त असलेल्या खिडकीतून पाहिले तर विलक्षण दृश्य दिसते होते.
खाली रस्त्यावरून मोटारींची रांग हळू हळू पुढे सरकत होती. अधून मधून दिवे लागत होते. पण पश्चिम क्षितिजावर सूर्याचे लाल बिंब स्वच्छ आकाशात एकाएकी लागलेल्या दिव्यासारखे भासले. पलंगावरून उठून खिडकीशी जाऊन किती तरी वेळ ते दृश्य नजरेत आणि काळजात साठवीत उभा राहिलो.
हळूहळू सूर्यंबिंब डुबू लागले. पूर्ण बिंबाचे अर्धबिंब झाले आणि नंतर अधिक लहान होत होत शेवटी कुंकवाची एक लकेर रहावी असे राहिले. क्षणाभरात तेही लुप्त झाले. आणि सूर्य गेला-काहीतरी हरवले असे वाटून मी खिडकीतून मागे फिरलो. उगीच एकाकी वाटू लागले.
काहीसा थकलोही होतो. स्नान करावयाचे ठरविले. गरम पाण्याचा टब भरून घेतला. त्यात पडून राहिलो-बराच वेळ-स्नानानंतर हलके वाटतेच. स्वच्छ नवे कपडे घातले आणि मघाशी उभा राहिलो होतो तेथे सहज चाळा म्हणून खिडकीपाशी गेलो. आणि काय आश्चर्य!