किंमत म्हणून आम्हाला योग्य वाटेल ती- परदेशी कंपन्या मागतील ती नव्हे - किंमत देतो. Confiscation करीत नाही. appropriation or acquisition करतो असे सूत्र सांगितले.
दिसतात तरी शांत, हसतमुख व निर्धास्त. त्यांनी भारताविषयी व जागातील पुरोगामी धोरणाविषयी असलेला जिव्हाळा व्यक्त केला. मग आम्ही निरोप घेतला.
दुपारचे जेवण बांगला देशच्या विदेशमंत्र्यांबरोबर त्यांच्या हॉटेलमध्ये, त्यांच्या खोलीवर घेतले. ते येथे येताच एकत्र खाजगी बसून बोलावयाचे आहे असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे हा बेत पार पडला.
दीड तास एकत्र बसून बोललो, म्हणजे तेच जास्त बोलले. मी बरेचसे ऐकण्याचे काम केले. बिचारा आठ दिवसांपूर्वी जिनिव्हावरून कुटुंबीय तेथेच ठेवून चर्चेसाठी शेखसाहेबांनी बोलाविले म्हणून भेटावयास गेला. तेथे पोहोचताच शेखसाहेबांनी त्यांना 'शिपिंग' चे मंत्रि बनविले.
त्यांना मंत्रिपद नको होते. ते जिनिव्हामध्ये सुखी होते. एक वेळ बांगलादेशचे ते प्रेसिडेंट होते. आठ दिवसांनंतर शेखसाहेबांची हत्या झाली व सर्वच चित्र बदलले. अनिश्चिततेमुळे गोंधळून गेले. त्या दिवशी ४ वाजता कॅबिनेट सेक्रेटरीचे नव्या अध्यक्षांमार्फत निमंत्रण आले आणि पुन्हा मंत्रि झाले.
२०-२१ ला विदेशमंत्रि म्हणून नेमणूक जाहीर झाली व २२ तारखेला लिमाचे दौऱ्यावर बाहेर आले आहेत. मी, पूर्वी ते प्रेसिडेंट म्हणून दिल्लीला आले होते तेव्हा भेटलो होतो. हिंदुस्थानशी मंत्री करण्याचे धोरण आपण चालविणार आहो असे त्यांनी सांगितले. पुष्कळ बोलले. त्यांच्याशी झालेल्या बोलण्याची मी एक स्वतंत्र टिप्पणीच करतो आहे.
तळमळीने बोलत होते परंतु मनाने थकलेला, काहीसा घाबरलेला वाटला. पूर्वी चीफ जस्टिस असल्यामुळे संस्कार राजकारणाचे नाहीत. त्यामुळे राजकारण किती स्थिर आहे त्याची त्यांना खात्री नाही.
बांगलादेशवर प्रेम आहे. तो चांगला चालावा व आपली त्याला मदत व्हावी असे त्यांना वाटते. पण आपले नक्की किती चालेल व मानले जाईल याची त्यांना निश्चिति वाटत नाही.
सत्ता खऱ्या अर्थाने अजून सैन्याचे हाती आहे. परंतु खोंडकर मुश्ताफ अहमद is managing them well so far वगैरे वगैरे. या भेटीची आवश्यकता होती. वैयक्तिक संबंध निर्माण होणे परराष्ट्रसंबंधाच्या संदर्भात सहाय्यभूत होते या दृष्टीने.
४ नंतर प्लेनरी सेशनमध्ये परत गेलो. मिडल् ईस्टच्या प्रश्नावर अरब व आफ्रिकन यांचे कालपासून विवाद चालू होते. अरब व आफ्रिकन देश यांच्यामध्ये एक नवी तेढ दिसली. हे अरब दडपेगिरी करतात असे स्पष्टपणे आफ्रिकन बोलत होते. युगोस्लाव्हिया व आम्ही हा वाद वाढू नये असा प्रयत्न करीत होतो.