विदेश दर्शन - १४३

७३ लिमा (पेरू)
१३ ऑक्टोबर, १९७५

सर्व दिवस कामाचा व गर्दीचा गेला. सकाळी ९ वाजता उद्योगमंत्र्यांना भेटलो. काल रात्रीच्या आमच्या एम्बसीच्या चहापानाच्यावेळी भेटलो होतो. नेव्हल ऑफीसर होते.

येथील सर्वच मंत्रि सैन्याचे प्रतिनिधी आहेत. मोकळा माणूस वाटला. इंग्रजी उत्तम बोलतो. त्यामुळे भाषा-मध्यस्थाची गरज पडली नाही. सर्वसामान्य सहकार्याची क्षेत्रे कोणती आहेत व काय काय करणे शक्य आहे यासंबंधी संभाषण झाले.

नंतर मध्यंतरात वेळ होता व जवळच समुद्रकाठ होता म्हणून बीचवर गेलो. हवेत खूपच गारठा होता म्हणून गाडीतून बीचवरच्या रस्त्यावरून भटकलो. समुद्रकाठाला नैसर्गिक अशी १५०-२०० फुटांची उंच अशी उंचवटयाची देणगी आहे. त्यामुळे शहर, समुद्रापासून सुरक्षित उंचीवर आहे. दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरून पॅसिफिकचे प्रथम दर्शन झाले.

त्यानंतर व्यापारमंत्री यांना भेटलो. कहाणी तीच सांगावयाची होती. त्यामुळे अर्ध्या तासात भेट संपविली.

परिषदेत दीड तास काढला व नंतर प्रेसिडेंटना भेटण्यासाठी त्यांच्या प्रासादावर गेलो. लष्करी बंदोबस्त ठाकठीक होता. १०-१५ मिनिटे थांबल्यावर भेटीसाठी आत गेलो. सोबत श्री. केवलसिंग व डॉ. तेजा होते. ४५ मिनिटे काढली.

समारंभात आर्टिफिशल पाय होता - त्यामुळे ते उभे राहून बोलत होते. परंतु आता तो तुटका पाय घेऊन खुर्चीवर बसूनच त्यांनी आमचे स्वागत केले. हसतमुखाने. आमच्या पंतप्रधानांची चौकशी केली. हिंदुस्थानच्या परिस्थितीबाबत बोललो.

त्यांनी आमच्या अॅटमबॉम्बची तयारी कशी चालली आहे विचारले. मी त्यांना, आम्ही बॉम्ब तयार करणार नाही, तशी आमची नीति नाही. आर्थिक विकासासाठी अणुसंशोधन वापरावे या धोरणाने आम्ही वागतो आहोत वगैरे खुलासा केला.

मी त्यांना हे सर्व सांगितले खरे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांनी ते खरे मानलेच आहे असे मला तरी वाटले नाही. हे लष्करी राजकारणी असल्या धोरणांना किती मानणार कोण जाणे?

त्यांनी विषय बदलला व आपल्या देशातील गेल्या सात वर्षांत रेव्होल्यूशनने काय काय कार्य केले त्याची रसभरीत कहाणी सांगितली. पुढे आपण कोण-कोणती पुरोगामी धोरणे आखली आहेत ते सांगितले.