दुपारी ५ नंतर एका कमिटीशी चर्चा करून श्री. मॅक्नामारा यांना भेटण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या कचेरीत गेलो. भेट ठरली होती. माझे तसे काम नव्हते. Old times sake courtesy visit चे स्वरूप होते. परंतु मी गेलो तो त्यांच्या एका बोर्डाच्या वादग्रस्त सभेत ते गुंतले होते. निरोप ठेवून मी एम्बसीमध्ये परतलो. कारण तेथे मोठया प्रमाणात रिसेप्शन होते.
श्री. मॅक्नामारा बिचारा सज्जन माणूस मीटिंग संपल्यानंतर माफी मागण्यासाठी एम्बसीवर आला. 'कामात होता, मी समजू शकतो' असे मी सांगितले तरी तो पुन्हा पुन्हा माफी-माफी असे म्हणत होता. पुढच्या खेपेला याल तेव्हा जेवायला या असा आग्रह धरून बसला. होकार दिला तेव्हा तो गेला. ही पुढची खेप केव्हा आहे कोण जाणे ?
रात्री गंजूकडे जेवण झाले. त्याच्याकडे नामवंत पत्रकार जमतात. १९७१ सालापासून आमचा हा वार्षिक कार्यक्रम झाला आहे. मध्यरात्र उलटून जाईपर्यंत चर्चा - वाद चालतात. परंतु त्यांत मैत्री असते.
दुसऱ्या दिवशी सात वाजता शिकॅगोसाठी निघालो. अशी ही वॉशिंग्टनची भेट झाली.
आज न्यूयॉर्कहून निघालो ते ११ तारीख सुरू झाली. बरोबर एक वर्षापूर्वी ११ ऑक्टोबरला मी विदेशमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली.
वर्षपूर्तीचा प्रसंग विमानप्रवासात यावा ही विदेशमंत्र्याच्या दृष्टीने, म्हटले तर औचित्यपूर्ण अशीच गोष्ट आहे. पण हे वर्ष कसे गेले ते लक्षात आले नाही.
भारताच्या जीवनात मात्र हे वर्ष संकटाचे व कटकटीचे ठरले. उद्याचा एक दिवस लंडनला राहीन आणि विजयादशमीला सकाळी घरी.