विदेश दर्शन - १२९

६७ काबूल
३१ ऑक्टोबर, १९७५

(हॉटेल इंटर-कॉन्टिनेन्टल)

हिंदुस्थान-अफगाणिस्तानचे वेळाचे अंतर फक्त एक तासाचे आहे. तेथून दीड वाजता निघून येथे २॥ वाजता पोहोचलो.

बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवरून विमान-प्रवास झाला. मला वाटते, यापूर्वी १९६४ सालात मॉस्कोला गेलो होतो तेव्हा आणि बहुधा ताश्कंदवरून परत येताना असा प्रवास झाला असावा (१९६६.)

अफगाण-आर्यन लाइनला जो रस्ता पाकिस्तानने दिला आहे तो सिंध-बलुचिस्तान या मार्गे दिला आहे. त्यामुळे विमानातून वैराण माळाशिवाय काही दिसले नाही.

वाटेत सहज मनात आले की, विमान खैबर खिंडीवरून जाईल काय? वैमानिकाकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, खैबर वाटेत दिसणार नाही. मला उगीचच निराश झाल्यासारखे वाटले.
या खैबर नावाचे काय आकर्षण माझे मनावर आहे समजत नाही. पण ही गोष्ट फार जुनी, लहानपणापासूनची आहे.

इतिहास वाचू-समजू लागल्यापासून, आर्यांचेपासून मोगलांपर्यंतचे सगळे वसाहतवाले वा आक्रमक या खिंडीतून आले. हिंदुस्थानचे जीवनावर, संस्कृतीवर या खिंडीचा प्रभाव अशा तऱ्हेने कारणीभूत आहे अशी काही भावना मुळाशी असावी कदाचित.

पण हा प्रभाव पुढेही बराच असावा अशी माझी आठवण आहे. कोल्हापूरला कॉलेजमध्ये असताना श्री. बिडेश कुलकर्णी आणि माझा पहिला परिचय होऊन त्याचे गहिऱ्या दोस्तीत रूपांतर झाले त्या काळात आमच्या नानातऱ्हेच्या चर्चा झाल्याचे आठवते.
त्यामध्ये समाजवादी राजकीय तत्त्वज्ञानापासून बंगला बांधला तर, वा आवडीने कुत्रा ठेवला तर त्यांची नावे काय ठेवायची हे सर्व विषय येऊन गेले होते. (नमुनेदार कनिष्ठ मध्यमवर्गीय मनोवृत्तीचा हा एक अजब पुरावा आहे की नाही ?)

मी ह्या वेळी गंभीरपणाने जाहीर केले होते की बंगला बांधला तर त्याचे नाव ठेवीन 'खैबर' आणि कुत्रा आवडीने पाळला तर त्याचे नाव ठेवीन 'बादशहा.'