विदेश दर्शन - १३३

६९ न्यूयॉर्क
२ ऑक्टोबर, १९७५

आज म. गांधीजींचा जन्मदिवस. दुपारी यू. एन्. सेक्रेटरी श्री. वाल्डहाईम यांना आमच्यातर्फे दुपारचे जेवण दिले. २५-३० देशांचे प्रतिनिधि व आमचे काही प्रतिनिधि हजर होते.

मी माझ्या भाषणात महात्माजींच्या जन्मदिवसाची आठवण दिली. गांधीजींचे जीवनकार्य आणि राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट कसे मिळते-जुळते आहे याचा उल्लेख केला.

सेक्रेटरी जनरलनी आपल्या उत्तराच्या भाषणात 'एक महान् मानव आणि सर्व मानवांचा नेता' या शब्दांत गांधीजींचा सन्मान केला. सर्व हजर देशांच्या प्रतिनिधींनी आनंदाने टाळयांच्या गजरात त्याला साथ दिली. हिंदुस्थानपासून हजारो मैल दूर गांधीजींचा जन्मदिवस आम्ही आज असा साजरा केला.

दुपारी शहरात चक्कर टाकण्यासाठी शरद काळेसह बाहेर पडलो. फिफ्थ अव्हेन्यू हा येथील (मॅनहॅटनमधील) अतिशय फॅशनेबल भाग मानला जातो.

काही आर्टस् सेंटर्स, बुक-शॉप्स् आणि अॅन्टिक् कलेक्शन्स प्रामुख्याने पहावयाची असे आम्ही ठरविले.

देशोदेशींच्या आजच्या कलाकारांची ही मोठी बाजारपेठ आहे. 'असोसिएशन ऑफ आर्टस्' या केंद्रावर गेलो. अनेकविध चित्रे पाहिली. २० डॉलर्सपासून १० हजार डॉलर्सपर्यंतच्या किंमतीची चित्रे येथे आहेत.

डोळे भरून पहाणे हा आमचा उद्देश. तास दीड तास तेथे काढला. पाय निघत नव्हता आणि खिसा रिकामा होता. अशी आमची परिस्थिति!

एका कलाकाराची चित्रे मला भारीच आवडली. सर्वांत स्वस्त १२० डॉलर्स म्हणजे सुमारे ११००-१२०० रुपयांचे चित्र होते. बरे झाले त्या वेळी मजजवळ पैसे नव्हते. नाहीतर निदान ते तरी चित्र न्यूयॉर्कची आठवण म्हणून घेतले असते.

एका प्रसिध्द अॅन्टिक्-केंद्राचे नाव ऐकून होतो म्हणून त्या पत्त्यावर गेलो तर दुकान बंद करून, 'भाडयाने देणे आहे' अशी पाटी लावून मालक मोकळा झालेला दिसला. दोन, चार दुकाने टाकून असेच दुसरे दुकान होते. तेथे गेलो तर तेथे तो दुकानाचा मालक चर्चेच्या ओघात भेटला. हे दुकान त्याच्या भावाचे म्हणून तेथे बसावयास आला होता. गिऱ्हाइक नाही म्हणून हळहळत होता.

काही वस्तूंवरून नजर हलत नव्हती. इतक्या सुंदर वस्तु होत्या. मी त्याला सांगितले, ''मी फक्त नेत्रसुखासाठी आलो आहे.'' तो म्हणाला, ''जरूर पहा. आता पैसे नसले तरी घेऊन जा. हिंदुस्थानमधून चेकने पैसे पाठवून द्या. माझा तुमच्यावर विश्वास आहे.''

मी त्याचे आभार मानले. कधी मजजवळ इतके पैसे असले तर जरूर परत येईन असे म्हणून बाहेर पडलो. एकेक अनुभव व आनंद नमुना म्हणून लिहीत आहे.