६५ न्यूयॉर्क
२२ सप्टेंबर, १९७५
या वेळी विमान वेळेवर निघाले आणि लंडनलाही वेळेवरच पोहोचले. कदाचित अर्धाएक तास उशीर झाला असला तरी निदान माझ्या तो ध्यानात आला नाही. वाटेत सात तास झोप मिळाली.
कुवेत केव्हा येऊन गेले ते समजले नाही. जागा झालो तेव्हा अंधारच होता. मासिके वगैरे वाचण्याचा प्रयत्न केला. त्यात मन रमेना. तेव्हा वाचण्यासाठी बरोबर घेतलेले 'Conversations with Kennedy' बाहेर काढले आणि पुढचा वेळ केव्हा गेला ते कळले नाही.
रोम आले-गेले. फ्रँकफर्ट आले गेले. लंडनपर्यंत हाच उद्योग केला. थोडेफार खाण्यासाठी येत होते पण मी वाचनात गुंतून गेलो.
डेलिगेशनच्या आमच्या सभासदांपैकी श्रीमती माया रे आणि रेव्ह. मथाई हे दोन सभासद बरोबर होते. थोडा वेळ त्यांच्याशी बोलण्यात गेला. हे दोन्ही सभासद महत्त्वाचे ठरतील. माया रे आदबपूर्वक येऊन बोलून गेल्या. मथाईही. मोठया उमेदीने व हौसेने यू. एन्. च्या कामाकडे ते पहात आहेत.
लंडनला नेहमीप्रमाणे नटवरसिंग आणि श्री. बी. के. नेहरू भेटले आणि सेव्हॉयमध्ये घेऊन गेले. मुंबई ते लंडनपर्यंत १७-१८ तास प्रवासात गेले होते. येथे तर दुपारचे १२॥-१ वाजले असावेत.
सबंध दिवस पुढे होता पण मी थकून गेलो होतो. त्यांनी कार्यक्रमाच्या काही सूचना केल्या. परंतु मी हॉटेलमध्ये पोहोचताच विश्रांति घेण्याचे ठरविले.
तीन चार तासांच्या विश्रांतिनंतर गप्पांसाठी व जेवणासाठी म्हणून नेहरूंकडे गेलो. आम्ही दोघेच होतो. पुष्कळ गोष्टी बोलून झाल्या.
फ्रान्सच्या धर्तीवर आमची घटना बदलली पाहिजे असे त्यांचे पूर्वीपासूनचे मत, या वेळी आग्रहाने मांडत होते. याच आठवडयात ते भारतात काही आठवडयांसाठी जात आहेत. तेथे श्रीमतीजींशी बोलून घ्या असा सल्ला मी दिला. माझ्या मते अशा बदलाची जरूरी नाही असे माझे मत मी दिले.
या तऱ्हेच्या बदलाची गरज नाही. पुढे कसे काय जावे लागणार आहे - इमर्जन्सीचा उपयोग कसा करणार ? ती किती दिवस राहील ? इलेक्शन होतील ? आणि झाली तर केव्हा ? इमर्जन्सी ठेवून की उठवून ? किती तरी पर्यायांची चर्चा झाली.
इंदिराजींशी माझे जे बोलणे झाले आहे त्यावरून हळूहळू रिलॅक्सेशनची भूमिका दिसली. खरे म्हणजे १५ ऑगस्टपासूनच ही प्रोसेस सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु बांगलादेश अरिष्टामुळे ते लांबणीवर पडले आहे.
मी त्यांना येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेणे इष्ट आहे असे माझे मत दिले आहे हे सांगितले.