यासाठी घटनात्मकदृष्टया इमर्जन्सी हटवलीच पाहिजे याची गरज नाही. मात्र सर्व राजकीय नेते सोडून दिले पाहिजेत. सेन्सॉरशिप ढिली करून संपादकांच्या सल्ल्याने, गाइड-लाइन्स तयार करून घेऊन त्याची अंमलबजावणी त्यांचेवरच सोडली पाहिजे. म्हणजे त्यांचीही परीक्षा होईल आणि निवडणुकीसाठी आवश्यक असे स्वातंत्र्य राहील. हा प्रोसेस मला व्यवहार्य दिसतो. (आजच्या परिस्थितीत.)
आता विरोधी पक्षांनी निवडणुकांत भाग न घेण्याचे ठरविले तर त्यांचा तो वेडेपणा ठरेल. पण देशाचे दुर्दैव अजून संपले नाही असे म्हणावे लागेल अशी माझी भूमिका सांगितली. गोष्टी मध्यरात्रीपर्यंत चालल्या.
दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासासाठी सकाळी आरामात तयार होऊन १० वाजता निघालो. बरोबर नटवरसिंग होता. तो यू. एन्. डेलिगेशनचा सभासद आहे. सिक्युरिटी कौन्सिल-निवडणुकीसाठी तो उपयोगी पडेल. श्रीमतीजींच्या खास विश्वासातील म्हणूनही तो या डेलिगेशनवर आहे.
त्याचे मते सिक्युरिटी कौन्सिलची निवडणूक आम्ही कारणाशिवाय लढत आहोत. महत्त्वाचे प्रश्न (आमच्या दृष्टीने) येण्याची शक्यता नाही. पाकिस्तान व मुस्लिम राष्ट्रे यू. एस्. ए. च्या व चायनाच्या मदतीने कसून प्रयत्न करून आमची कसोटी करणार. यश तसे सोपे नाही वगैरे त्याचे म्हणणे सांगत होतो.
अडचण होणे शक्य आहे आणि चीन, यू. एस्. ए., पाकिस्तान हा एक अॅक्सिस् बनत चालला आहे आणि या निवडणुकीसाठी तो क्रियाशील होण्याची शक्यता आहे हे मलाही मान्य आहे. ४० इस्लामी देश ऐनवेळी भाई-भाईची भूमिका किती घेतात तेही संभाव्य संकट आहेच. मला या सर्व गोष्टींची जाणीव आहे.
परंतु उमेदवारी जाहीर करून ८-१० महिने झाल्यानंतर आता हे सद्गृहस्थ निवडणुकीच्या रस्त्यावर आम्ही जावयासच नको होते हे शहाणपण इतक्या उशीरा का देत होते ?
माझ्या मनात शंका चाटून गेली की, इलेक्शन अवघड - विरोधी गेले तर ''आम्ही म्हणत नव्हतो ?'' असे म्हणावयास रस्ता मोकळा ठेवण्याचा श्रीमतीजींचाच खेळ तर नाही ?
नटवरच्या मुखातून हे बाहेर आल्यामुळे ही माझी शंका अगदीच अस्थानी नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची - दोस्तांची परीक्षा होईल. आता परत वळणे नाही असे माझे स्पष्ट मत दिले.
लंडन-न्यूयॉर्क प्रवास आरामशीर झाला. केनेडी-एअरपोर्टवर आगत-स्वागत, 'कार्लाईल'च्या त्याच 4M या खोलीत पुनरागमन.
परिषदेचे कागद चाळले. डेलिगेशनचे काही मेंबर्स आज आले. श्री. विठ्ठलराव गाडगीळ अजून आले नाहीत. उद्या यावेत. डेलिगेशनची पहिली बैठक परवा ठेवली आहे.
आज बैठकीत जाऊन आलो. यू. एस्. ए. चे स्टेटमेंट झाले. बऱ्याच महत्त्वाच्या मंडळींशी 'हॅलो' झाले. इथल्या मुक्कामाची व कामाची अशी सुरूवात तर झाली आहे.