विदेश दर्शन - १३२

६८ काबूल
१ नोव्हेंबर, १९७५

काल लिहून पुरे केले परंतु आजचा दिवस मी माझ्या आयुष्यात महत्त्वाचा मानला आहे. आज येथे २५००-३००० वर्षांपूर्वीचे देवीचे दर्शन झाले. फक्त एकच हिंदू दैवत येथे उरले आहे.

इथले हिंदू या देवीला 'आसामाई' म्हणतात. काबूल शहरात 'आसामाईचा' डोंगर आहे. त्याच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. मंदिर अलीकडचे असावे. परंतु आतली पूजेची वस्तु मला तरी निराकार दिसली. प्राचीन असावी असे वाटले. काबूल-कंदाहार ही भारतीय संस्कृतीची केंद्रे होती. तेव्हा 'आशामाई' चे हळूहळू रूपांतर 'आसामाई' त झाले असावे.

म्युझियम्स पाहिली. बुध्द संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने आहेत. म्युझियमचा अफगाण संचालक तज्ज्ञ दिसला. मी गेल्या चार पाच दिवसांत येथील अनेकांना विचारलेला प्रश्न यांनाही विचारला. 'अफगाण' याचा निश्चित अर्थ काय? ही काही विशेष 'ट्राइब' नाही. या देशात वेगवेगळया वंशगटांनी आक्रमणानिमित्त हजारो वर्षांच्या कालखंडात वास्तव्य केले आहे. मग याला 'अफगाणिस्तान' का म्हणतात वगैरे.

मला कोणी फारसे समाधानकारक उत्तर दिले नव्हते. या गृहस्थाने 'अश्ववाहन'चे अफगाण झाले आहे असे सांगितले. उत्तम घोडेस्वार या देशात आजही आहेत. घोडेस्वारीचे धाडसी खेळ हा राष्ट्रीय षोक आहे. भारतावर व इतरत्र आक्रमण करणारांनी आपली 'घोडदळे' येथे उभारली. म्हणून अश्ववाहकांचा म्हणजे घोडदळांचा देश असा त्याचा अर्थ. हा अर्थ भाषाशास्त्र आणि इतिहास यांच्या संदर्भात योग्य वाटतो.

मोंगल साम्राज्याचे संस्थापक बादशाह बाबर यांची कबर येथे आहे. ती पाहिली. ४०-४५ वर्षांपूर्वी ती अगदीच वाईट स्थितीत होती. पण आज ती चांगल्या स्थितीत आहे. भोवतालचे वातावरण शांत-गंभीर आहे.
काबूलपासून औरंगाबादपर्यंत मोगल सम्राटांच्या कबरी इतस्तत: आहेत. एका षोकिन सम्राटाची पत्नी होऊन त्याच्या आधी मरण्याचे कर्तृत्व दाखविल्यामुळे मुमताजमहालचे जगविख्यात स्मारक ताजमहालच्या रूपाने उभे आहे. ते साम्राज्य उभे करणारा मात्र एका बाजूला, पण त्याच्या आवडत्या शहरात चिरंतन विसावा घेत आहे!

आज दिवाळी. तुम्हा सर्वांची फार आठवण झाली. गेल्या २५-३० वर्षांत ही पहिलीच दिवाळी मी तुझेपासून दूर आहे ! अगदी एकटा परदेशात आहे. सकाळी 'आसामाईचे' दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.