६४ जिनेव्हा
७ सप्टेंबर, १९७५
सकाळी ७ वाजता येथे पोहोचलो. ऱ्होन नदीच्या काठावरील (Hotel Du Rhone Geneve) या हॉटेलमध्ये येऊन उतरलो आहे.
श्री. ब्रजेश मित्र व अवतारसिंग, येथील यू. एन्. चे व स्वित्सर्लंडचे राजदूत आहेत, ते भेटले. नंतर श्री. राम प्रधान भेटले. बऱ्याच दिवसांच्या गोष्टी बोलून झाल्या.
दुपारी लंचच्या निमित्ताने बाहेर गेलो. गावात फेरफटका मारला. जुने शहर, जे पुराण्या तटबंदीच्या आत आहे ते पाहिले.
पूर्वी मी काही तासांसाठी येथे थांबलो होतो. नदी, सरोवर व त्यांच्या काठावर सुंदर वृक्षराजीमध्ये लपलेली सुंदर वास्तूंची नगरी - रविवार असल्यामुळे शांत शांत वाटत होत. तसे हे शहर पुराणे असले तरी लोकसंख्येने लहान आहे.
यू. एन्. ची अनेक ऑफिसे येथे आहेत. त्यामुळे त्या लोकांचीच ५० हजार वस्ती असेल. ८०० - १००० हिंदी लोकही आहेत. पुण्याचे कोणी श्री. जगताप मोठया आपुलकीने भेटून गेले.
संध्याकाळी श्री. प्रधान यांचे घरी चहाला गेलो. घरगुती वातावरण होते. त्यांचा मोठा मुलगा भेटला. हुषार पण समजदार-आधुनिक तरुण भेटल्याचा आंनद झाला. रात्री श्री. ब्रजेश मित्र यांचेकडे जेवण केले.
उद्या येथून फ्रँकफर्ट व तेथून लगेच दिल्ली असा प्रवास आहे.
दिल्ली कशी आहे? अशा लांबच्या दौऱ्यावरून (या महिन्यात) परत येत असता काहीतरी उलाढाल वाढून ठेवलेली असते. या खेपेला काय याचे जरूर कुतूहल आहे. चिंता नाही.