आर्थिक प्रश्नावर मात्र ते अमेरिकेच्या धोरणावर टीका करीत होते. व्यापारी सवलती देत नाहीत, प्रभुत्व ठेवण्याचा प्रयत्न करतात वगैरे.
मी विचारले, यासाठी तुम्ही काय उपाययोजना करीत आहात. तेव्हा फारसे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. उघड अमेरिकाविरोधी दिसू नये पण (अमेरिकेची धोरणे पसंत नाहीत असे काहीसे विसंगत-) विरोधी बोलणे वाटले.
हिंदुस्थानबद्दल फार आपुलकीने बोलले. सहकार्य-राजकीय व आर्थिक, वाढविण्यासंबंधीही चर्चा केली. मनुष्य मुरलेला, शहाणा राजकारणी वाटला. बोलण्यात, वागण्यात अनौपचारिक मोकळेपणा होता. लॅटिन अमेरिकन प्रेसिडेंटचा लिमामधील एक नमुना पाहून आलो होतो. तेव्हा माझ्या मनात असे तसे काही विचार येऊन गेले.
काही म्हणजे तीन आठवडयांपूर्वीच या प्रेसिडेंटनी Chief of Army Staff ला नोकरीतून एका मध्यरात्री तडकाफडकी हाकलून दिल्याची आठवण माझ्या मनात ताजी होती. डेव्हलपिंग देशांतील फौजी लोक लोकशाहीला धोका देण्याचा संभव हल्ली फार वाढला आहे. लॅटिन अमेरिकेची ही जुनी परंपराच आहे. १९५० ते ६० दरम्यानच्या दशकांत ४ वर्षे हा प्रकार या देशातही झाला होता.
रात्री मदनजीत सिंह (राजदूत) यांच्या घरी रात्रीचे भोजन झाले. मंत्रिमंडळातील तीन प्रमुख मंत्रि आले होते. विदेश मंत्रि बाहेर गेलेले होते. त्यामुळे ते आले नव्हते. तरूण व तज्ज्ञ अर्थमंत्रि भेटले.
गेल्या वर्षी आय. एम्. एफ्. च्या बैठकीत ओळख झाली होती. आज बराच वेळ त्यांच्याशी बोलता आले.
मदनजीत पति-पत्नी आनंदात होते. त्यांचा एक हुषार मुलगा आहे. हे सर्वजण मला मेक्सिकोत भेटले होते. मदनजीत चित्रकला, शिल्पकला यांचा व्यासंगी तज्ज्ञ आहे. हिमालयीन आर्टस् व अजंठा यावरील त्यांची पुस्तके जगप्रसिध्द आहेत. जेवण्याच्या वेळी त्याने एक सुरेख भाषण केले.
A lovely Evening! आसमंतात विजेच्या दिव्यांनी चमचमणारी व इतस्तत: पसरलेली ही विस्तृत नगरी एका उंच ठिकाणी जाऊन डोळे भरून पुन्हा एकदा पाहिली व हिल्टनच्या विस्तृत व सुखद खोलीकडे परतलो. पुढचे न्यूयॉर्कमधून लिहीन.