विदेश दर्शन - ११३

५९ लिमा (पेरू)
२९ ऑगस्ट, १९७५

आजचा दिवस पेरूच्या इतिहासात बदलाचा निघाला. अर्थात हा बदल बरा की नाही हे काळ ठरवील. आमच्या दृष्टीने काहीसा विस्मयाचा आणि अपेक्षाभंगाचा असा हा दिवस उगवला म्हटले तरी चालेल. माझ्या दृष्टीने या महिन्यातील आश्चर्याचे दिवस अजून संपलेले नाहीत असे वाटले.

येथे आज अचानक व अनपेक्षित राज्यक्रांति झाली. 'कूप' होतो असे वाचतो, ऐकतो परंतु जेथे होतो तेथे काय होते वा काय घडते ते आज अनुभवले. मात्र सुदैवाने यात कोठे रक्तपात झाला नाही.

आज सकाळी लवकर उठावे लागले. कारण भूतानचे विदेशमंत्रि ८ वाजता येणार होते. तसे ते आले. तास-दीडतास होते. त्यांनी आज फारच मोकळे बोलून मनाला चिंता वाटेल असे प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की, भारत-भूतान मैत्री आहे पण ती भारताच्या बाजूने एकांगी आहे. भूतानच्या दृष्टीने काही प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यांची स्पष्ट चर्चाच होत नाही. आणि त्यामुळे lack of communication आहे असे त्यांना वाटते. या गृहस्थाविषयी माझी जी शंका आहे ती खरी ठरत आहे. हा काही ना काही प्रश्न उपस्थित करून या दोन देशांच्या संबंधात काही अडचण निर्माण करील असे मला सतत वाटत आहे.

भूतानमध्ये एक नवी संशयाची व काहीशी भारताविरोधी भावना मूळ धरू पहात आहे. त्याला खतपाणी घालण्याचा यांचा उद्योग आहे. हा एक गटच आहे. परत गेल्यानंतर, भूतान राजे येणार आहेत त्यावेळी हे सर्व बोलून घेतले पाहिजे. योग्य वेळीच शंका निरसन झाले नाही आणि या लोकांचे धंदे उघडे केले नाहीत तर ही एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

सभागृहात ९॥ वाजता ब्यूरोची मीटिंग म्हणून आलो. या Nonalligned मीटिंग्जमध्ये कोणतीही बैठक ठरलेल्या वेळी होत नाही. मीटिंग १०॥ वाजता सुरू झाली.
 
अंगोलाच्या परस्परविरोधी वाढणाऱ्या दोन्ही मूव्हमेंटस् आहेत. MPLA आणि FLNA यांची यादवी स्वातंत्र्याच्या आड येईल असे दिसते. बोलावयाचे असेल तर दोघांनी नाहीतर कोणीच नाही असा निर्णय आम्ही घेतला. सभेचे चेअरमन - लिमाचे विदेशमंत्रि - त्यांनी वाटाघाटी करून हे सर्व ठरवावे असा निर्णय झाला.

हे सर्व होईतो ११-११। झाले. नंतर फ्लेनरीमध्ये राहिलेली स्टेटमेंट्स् होणार होती. अल्जेअर्सचे स्टेटमेंट महत्त्वाचे होईल या कल्पनेने मी पहिल्यापासून हजर राहिलो. त्यांचे स्टेटमेंट होईतो १२ वाजले. नंतर दुसरे प्रतिनिधी बोलावयाला आले. श्री. रिखी जयपाल माझे साथीला होते.

१२। चे सुमारास कॉन्फरन्स हॉल संदेशवहनाचे काम करणारी एक मुलगी धावतच माझेकडे आली व हातात एक कागद दिला. त्याचे उत्तर मागितले आहे असे म्हणू लागली.