विदेश दर्शन - ११७

६१ बोगोटा (Bogota)
(हिल्टन कोलंबिया)
 
३० ऑगस्ट, १९७५

दुपारी २ वाजता लिमाहून निघालो. ५॥ वाजता येथे पोहोचलो. बोगोटाची भेट अचानकच ठरली. आजची रात्र येथे राहून उद्या न्यूयॉर्कला जाईन.

८००० फुटांवरील ३० लाख वस्तीचे हे शहर या देशाची राजधानी आहे. विमान उतरत असतानाच मला काश्मीरची आठवण झाली. या उंचीवर एवढे निसर्गसुंदर मैदान-पठार ही एक विलक्षण गोष्ट आहे.

शहराच्या काहीसे पश्चिमेला एअर-पोर्ट आहे. तिथून निघून शहराकडे येऊ लागलो तेव्हा मावळतीचे कोवळे किरण या डोंगराच्या उतरणीवरून खाली विस्तृत होत असलेल्या शहरावर पडल्यामुळे मला तरी क्षणभर स्वप्नसुंदर शहर पाहतो आहे असे वाटले. प्रथमदर्शनी असा परिणाम क्वचितच होतो.

स्वच्छ हवा (without any polution) ही मोठया शहरातील दुर्मिळ गोष्ट येथे विपुल आहे.

वेळ थोडा आणि कामे बरीच आहेत. हॉटेलमध्ये सामान ठेवून, कपडे बदलून प्रेसिडेंट लोपेझ यांना भेटावयास त्यांच्या पॅलेसवर गेलो.

या देशात लोकशाही आहे. अध्यक्ष जनतेकडून निवडला जातो. तो आपले मंत्रिमंडळ बनवितो. पार्लमेंट ४ वर्षांसाठी निवडले जाते. प्रमुख दोन पक्ष आहेत. त्या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधि मंत्रिमंडळात आहेत. मंत्रि पार्लमेंटचा मेंबर असलाच पाहिजे हे बंधन नाही. Inflation २० टक्के. Balance of payment चा प्रश्न अजून नाही. oil चे बाबतीत स्वयंपूर्ण आहेत.

प्रेसिडेंटची भेट चांगली झाली. लिमाची परिषद कशी झाली विचारीत होते. आर्थिक ठराव चांगला झाला हे त्यांनी कबूल केले.

परंतु Non alligned चळवळ अमेरिकाविरोधी होत चालली आहे असा तक्रारवजा सूर त्यांनी काढला. स्वतंत्र तिसरा गट, हे त्याचे स्वरूप बदलत चालले आहे असे त्यांना वाटते.

मी माझे मत सांगितले की, तसे नाही. वेगवेगळया राज्यपध्दति व विचारधारा असलेले सर्व खंडांतील देश याचे सभासद आहेत. तेव्हा काही मतभेद व आग्रह अधून मधून व्यक्त होतात हे खरे. परंतु स्वतंत्र विदेशी नीति ठेवणारे (Developing) विकासमान देश याचे सभासद आहेत. व त्या अर्थाने ती स्वतंत्र चळवळ आहे. तिच्यामध्ये शक्ती आहे व तिला भविष्य आहे. विषय तिथेच सुटला.