विदेश दर्शन - ११५

आम्हाला निरोप सांगितला गेला की जेवण लवकर संपवून हॉटेलमध्येच थांबावे. रस्त्यावर काही गडबड होण्याची शक्यता आहे. मी माझ्या खोलीत जाऊन पडून राहिलो. दुपारच्या झोपेची नाही म्हटले तरी आवश्यकता होतीच.

चारला उठलो. चहा मागविला. वेटरला विचारले की, तुला काय वाटते याबद्दल. तो निर्विकारपणे म्हणाला, 'सर्व सारखेच, त्यात काय वाटायचे.'

सामान्य माणसाची ही प्रतिक्रिया. राज्यक्रांती म्हणजे उच्च पदस्थांनी जबरदस्तीने केलेले सत्तांतर. यात जनतेचा काही भाग नाही. त्यांच्या भावनांना स्पर्श नाही. त्यांना काही माहितीच नाही. पण हे सत्तांतर त्यांच्या भविष्यावर - जीवनावर परिणाम तर करणारच असा विचार करीत मी चार वाजता सभा असणार या कल्पनेने सभागृहाकडे गेलो.

वातावरण काहीसे वेगळे वाटले. जाताना वाटेत नेहमीची वाहातुक व लोकांची ये-जा चालू होती. पण एक गोष्ट लक्षात आली की, किंमती सामानाच्या स्टोअर्सची दारे (शटर्स) बंद होती. रस्त्यावर लष्करी पोलिस नेहमीपेक्षा अधिक होते.

सभागृहामध्येही नव्या चेहेऱ्यांची, लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिति अधिक भासली. त्यांच्या वागण्यात मात्र नम्रता होती. तेथे गेल्यानंतर समजले की सभा सहाला सुरू होणार आहे. म्हणून परत हॉटेलकडे परतलो. जॉर्ज केननचे मेमॉयर्स वाचत बसलो.

सहा वाजता परत गेलो. १५-२० मिनिटांनी सकाळी अचानक गुप्त झालेले विदेशमंत्रि हसतमुखाने आले व सभेचे काम सुरू केले.

त्यांनी Heads of delegation नी हजर रहावे अशी विनंति केली. त्यांनी थोडक्यात सांगितले की, ''नव्या प्रेसिडेंटनी सत्ता धारण केली आहे. 'कू' वगैरे काही नाही. हा परदेशी वृत्तसंस्थांचा खोडसाळ प्रचार (?) आहे. जुने प्रेसिडेंट आमच्या रेव्होल्यूशनरी चळवळीचे आदरणीय पुढारी राहतील. नव्या प्रेसिडेंटशी मी टेलिफोनवर बोललो आहे. Nonalligned च्या धोरणात बदल नाही असे तुम्हा सर्वांना सांगण्याचा आदेश दिला आहे. कदाचित उद्या ते परिषदेत येऊन भाषणही करतील.'' हे सांगून त्यांनी परिषदेचे काम तहकूब केले.

कारण सर्वांची भाषणे संपली होती. ठरावांचे कागदपत्र तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता परिषद ठरली.

मी त्यांच्याशी बोलत ऑफिसमध्ये गेलो. अधिक तपशील विचारला. त्यांना जे माहिती होते व सांगणे शक्य होते ते त्यांनी सांगितले.

''प्राईम मिनिस्टर हे या परिषदेच्या दिवसांत लिमामध्ये नव्हतेच. He was going up and down the country. आज सकाळी, त्यांच्या आर्मीचे पाच कमांड्स् आहेत. त्या सर्वांनी प्राईम मिनिस्टरचे नेतृत्वाखाली अध्यक्षांना राजिनाम्याची मागणी केली. आम्ही सर्व मंत्रि अध्यक्षांकडे जमलो होतो. तीन तास चर्चा झाली. त्यांनी सत्तांतरास मान्यता दिलेलीच होती. आम्हा सर्वांना नव्या अध्यक्षांना सहकार्य द्या असे त्यांनी सांगितले '' वगैरे.

मी त्यांना विचारले की, धोरणात बदल नाही, हे सर्व ठीक आहे पण बाहेर देशांचे इतके महत्त्वाचे लोक परिषदेला म्हणून तेथे असताना ही वेळ सत्तांतरासाठी का निवडली ? त्यानी, ' Honestly I don't Know' म्हणून सांगितले.

हा सर्व विषय मी येथेच सोडला आणि परत हॉटेलमध्ये गेलो. डोळयापुढे जुन्या प्रेसिडेंटची मूर्ति येत होती. मी कालच त्यांना भेटलो होतो. काल सर्वाधिकारी प्रेसिडेंट होते. आज ते कोणीच नाहीत. नशीब की ते जिवंत आहेत. सत्ते ! तुझा खेळ अजब आहे ! आणखी दुसरे काय म्हणावयाचे !