विदेश दर्शन - ११६

६० लिमा (पेरू)
२९ ऑगस्ट, १९७५

सकाळी ९ वाजता परिषदेचे काम सुरू झाले. ठराव संपले. पाहुण्यांच्यातर्फे यजमानांचे आभार मी मानावे, असे सर्वांनी एकमताने ठरविले होते.
परिषद सुरळीतपणे पार पडली होती. मी मन:पूर्वक लिमा सरकारचे व विदेशमंत्र्यांचे आभार मानले. या गृहस्थांनी अत्यंत जबाबदारीने, समजुतीने व सत्तांतराच्या गडबडीतही शांत राहून सभेचे काम समतोलपणाने पार पाडले होते. संपूर्ण सभागृहाने मन:पूर्वक टाळयांच्या गजरात ovation दिले.

१२ वाजता नवे अध्यक्ष इतमामाने आले. उंच रुबाबदार व्यक्तिमत्व आहे. १०-१५ मिनिटांचे भाषण केले. Non alligned ला पाठिंबा दिला. परंतु त्यांत जिवंतपणा नव्हता. उजव्या धोरणाची चिन्हे भाषणात स्पष्ट होती. अमेरिकेच्या जवळ जाण्याचे धोरण उघड वाटले. सहकाराचे वातावरण निर्माण करण्याचा उपदेश देते झाले.

आम्ही सभागृहातूनच विमानतळाकडे निघालो. परिषद संपेपर्यंत कोणतीच विमाने सरकारी आदेशाने जाऊ दिली नव्हती. त्यामुळे बोगोटाला जाणारे एअर फ्रान्सचे विमान आमची वाट पहात तिष्ठत उभे होते.
 
सरळ विमानात चढलो. मनात चिंता होती की, पेरूचे आमचे यजमान मित्र - विदेशमंत्रि आपल्या स्थानावर किती दिवस राहतील आणि कोणकोणते बदल वाढून ठेवले आहेत.

आठ दिवसानंतर हा देश सोडतो आहे. बोगोटोच्या वाटेवर प्रवासात हे लिहीत आहे.

पुन्हा केव्हा या देशात येता आले तर पहाण्यासारखे सर्व राहून गेले आहे ते पहाता येईल. पण त्या वेळी या देशाचे चित्र कसे असेल असा विचार मनात येऊन गेला.