सकाळी थोडा वेळ आराम केला. दुपारी १२॥ वाजता एअर-पोर्ट हॉटेलवर गेलो. जर्मनीच्या विदेश-मंत्र्यांनी, श्री. गेनचर (Hans Dietrich Genscher) यांनी दुपारचे जेवण तेथे दिले. ते मुद्दामहून एक तासाचा हेलिकॉप्टरचा प्रवास करून आले होते. त्यांची खरी इच्छा मी दक्षिण जर्मनीमध्ये, ते सुट्टीसाठी जेथे राहिले होते तेथे जावे अशी होती.
परंतु विमानप्रवास अधिक वाढविण्याची माझी इच्छा नव्हती. अजूनही मला जवळजवळ २० तास प्रवास करावयाचा आहे हे जाणून तेच येथे आले.
श्री. गेनचर यांची माझी ही पहिली भेट. मध्यम वयाचे (४०-५०) राजकारणी आहेत. लिमाचे वाटेवर मी आहे हे जाणून महत्त्वाच्या आर्थिक व राजकीय प्रश्नांवर विचारांची देवाण-घेवाण करणे हा उद्देश होता.
एका स्वतंत्र जागेत एकांतात १०-१२ लोकांचे आमचे हे बिझिनेस लंच २॥ तास चालले. प्रगत व संपन्न देश असला तरी आर्थिक प्रश्नांच्या अडचणींचा पाढा वाचत होते.
त्यांच्या व आमच्या प्रश्नांचे स्वरूप वेगळे आहे. हेलेसिंकी येथे झालेल्या परिषदेचे महत्त्व, त्यांतून निर्माण झालेल्या आशा-शंका यांचाही उल्लेख आला. मी आपले उपखंड आणि बांगला देश येथील परिस्थितीची रूपरेखा सांगितली. बांगलादेशमधील नवीन परिस्थितीबाबत निश्चित मत आज देणे अवघड आहे, परंतु आमच्या धोरणाची दिशा सहकार्याची राहील असेही मी सांगितले.
'इमर्जन्सी व प्री-सेन्सारशिप' ची चर्चा अपरिहार्यपणे आली. जर्मन सरकारने समजुतीची भूमिका घेतली आहे. परंतु येथील प्रेस फार विरोधी आहे. श्री. गेनचर म्हणाले, Press is a super power in our country. काहीसे विनोदाने असेल पण त्यात सत्यताही दिसली. मी इमर्जन्सी आणि आर्थिक कार्यक्रमाची थोडक्यात कारणमीमांसा दिली.
जागतिक आर्थिक प्रश्नांवर विरोधापेक्षा सहकार्यानेच संवाद चालू ठेवला पाहिजे व मार्ग काढला पाहिजे याबाबतीत त्यांचे सरकार व आमचे सरकार यांचे सामान्यपणे एकमत आहे.
मध्यपूर्वेबाबत लिमा परिषदेने एकांतिक भूमिका घेऊ नये अशी सल्लामसलत त्यांनी दिली. मी या बाबतीत आमची भूमिका सांगितली. इस्त्रायली आग्रही व हट्टाची भूमिका सोडीत नाहीत. अरब राष्ट्रावर अन्याय झालेला आहे. आम्ही त्यांचा पाठपुरावा करण्याची नीति स्वीकारली आहे हे स्पष्ट केले.
सहज विश्रांतिसाठी राहण्याचे ठरविले. परंतु नाही म्हटले तरी एक दिवसाची तशी ऑफिशियल व्हिजिट झाली म्हटले तरी चालेल.
आज सकाळी सहा पूर्वीच जागा झालो. ताजेतवाने वाटले. पुढच्या प्रवासाला आत्मविश्वासाने तयार झालो आहे.
George Kennen चे Memoirs चा दुसरा खंड वाचनासाठी बरोबर घेतला आहे. विदेशनीतीसंबंधी त्याचे लेखन, चिंतन प्रसिध्द आहे. त्याचे हे आत्मचरित्रात्मक लेखन तर फारच प्रसन्न आहे. हा सर्व प्रवास त्यांच्या संगतीतच जाणार याचा मला आनंद आहे.