५७ दमास्कस (सिरिया)
१ जून, १९७५
सकाळी ११ वाजता येथे पोहोचलो. मक्का-मदिनानंतर इस्लामध्ये या शहराला स्थान - धार्मिकदृष्टया - दिले जाते. त्याचप्रमाणे अरब राष्ट्रीयत्वाला जन्म देणारे शहर म्हणूनही राजकीयदृष्टया या शहराला महत्त्व आहे.
१२ लाख वस्तीचे शहर. शहराची पार्श्वभूमी म्हणजे चढती डोंगरांची रांग आहे. डोंगराच्या उतारावर शहराची वस्ती पसरत चालली आहे. खालच्या मैदानावरही विस्तृत पसरलेले हे शहर जगातल्या अत्यंत जुन्या शहरांपैकी एक आहे.
एक छोटीशी नदी शहरामधून वाहते. पंरतु ती वाहते हे लवकर ध्यानात येत नाही - अशी बांधबंदिस्ती आहे.
दुपारचे जेवण अॅम्बॅसिडरकडेच होते. तेव्हा मोकळा वेळ कामी लागावा म्हणून येथून ४० मैलांवर असलेल्या एका हेल्थ-रिसॉर्टवर चक्कर मारण्याचे ठरविले. (ब्ल्यूडॉन)
ओसाड व निष्पर्ण डोंगरांच्यामधून एक सुंदर खोरे आहे. दमास्कस सोडताना चिंचोळे दिसते. परंतु पुढे ते खोरे विस्तृत होत जाते. या खोऱ्यांतून जाणारा रस्ता लेबनॉनमध्ये बेरूतला जातो. बेरूत ४०-५० मैलांवर तास-दीड तासाच्या रस्त्यावर आहे.
या खोऱ्यात जसजसे पुढे गेलो, तसे उंची वाढत गेली. हवेत गारवा वाटू लागला. हिरव्यागार शेतीवाडीने भरलेले खोरे दृष्टिपथात येताच नेत्रांची तृप्ती होते.
ब्लूडॉन हे ४॥ ते ५ हजार फूट उंचीवर आहे. वाटेत नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. एका ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलो. झऱ्याचे पाणी आणि टर्किश कॉफी दोन्हींची चव घेतली, आणि दुपारी २ वाजता परतलो. संध्याकाळी सरकारी कार्यक्रम सुरू झाला. येथून ३५-४० मैलांवर असलेल्या कुनेत्रा शहराला भेट दिली. आता याला शहर तरी कसे म्हणावयाचे?
सर्व घरे इस्त्राइली सैनिकांनी बुलडोझर्सनी अक्षरश: नांगर फिरविल्यासारखी पाडली आहेत. ६० हजार वस्तीचे हे शहर भुताटकीच्या शहरासारखे उद्ध्वस्त झाले आहे.
१९६७ आणि ७३ मधील मध्यपूर्वेच्या लढाईमध्ये 'गोल्डन हाईट्स्' हे नाव आपण सर्वांनीच वृत्तपत्रात वाचले आहे. उंच मैदानाचा मुलुख म्हणून त्याला 'हाईट्स' हे नाव असावे. एका जिल्ह्याचे हे नाव. कुनेत्रा हे त्या जिल्ह्याचे प्रमुख शहर होते.
१९६७ मध्ये इस्त्राइली सैनिकांनी ते जिंकले. १९७३ च्या लढाईनंतर युध्दतहकुबीच्या तडजोडीत हे शहर सिरीयाला परत दिले गेले. ते देण्यापूर्वी शहर सोडून जाताना सैनिकांनी योजनापूर्व विध्वंस करून एका अर्थाने शहराचे स्मशान करून - त्यांच्या ताब्यात दिले. यू. एन्. मध्येही याची बरीच चर्चा झाली.