यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१३

मराठी साहित्य हे राष्ट्रीय जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही हे यशवंतरावांना मान्य होते. राष्ट्रीय आंदोलने आणि सामाजिक चळवळी यांची प्रतिबिंबे मराठी वाङ्मयात अवश्य पडावीत याविषयी त्यांचे दुमत नव्हते. साहित्यिकांचे तत्त्वज्ञान व विचार त्याच्या सामाजिक परिस्थितीवरून ठरत असते. 'माणूस' ख-या अर्थाने भौतिक, सामाजिक परिस्थितीतच घडतो. 'माणूस' हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. आणि या विषयाच्या अनुभूतीतून साहित्य निर्माण झाले पाहिजे आणि साहित्यिकाच्या साहित्य रचनेत समाज मनाचे प्रतिबिंब पडले पाहिजे असे त्यांना वाटते. यशवंतराव साहित्याचे स्वरुप सांगत असतानाच त्या साहित्याचा समाजजीवनासाठी आरशासारखा उपयोग झाला पाहिजे असे मत व्यक्त करतात. लोकजीवन समृद्ध करण्यासाठी साहित्याचा उपयोग व्हावा, ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेऊन तशा स्वरुपाची साहित्यनिर्मिती करावी. साहित्य हे संवेदनशील व पारदर्शक असावे या संदर्भात ते म्हणतात, "साहित्य हे थर्मामीटरमधील पा-यासारखे संवेदनशील असते. निदान असावे. समाज मानसामध्ये जे असते तेच साहित्यात अवतरते. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो." यावरून त्यांच्या विचारांची दिशा लक्षात येते. त्यांच्या साहित्य विचाराचे समाज हेच सूत्र आहे. त्यांच्या सर्वच विचारांमध्ये 'समाज' हा केंद्रीभूत आहे. समाजाभोवतीच त्यांचे सर्व विचार पिंगा घालताना दिसतात. समाजाचे प्रश्न, समस्या, सुखदु:खे सोडविण्यासाठी यशवंतरावा राजकारणाबरोबरच साहित्याचा उपयोग आणि वापर करून घेतात. यशवंतरावांनी समाजकारणाचे साहित्याचे आणि राजकारणाचे एकत्रीकरण केले. त्यांच्यातील राजकारणी समाजाचे, राष्ट्राचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देतो. समाजाचे अंतिम कल्याण करण्यासाठी झटतो. साहित्यिकानेही समाजाचे प्रश्न मांडावेत. त्यांच्या समोरच्या समस्या चित्रित कराव्यात. साहित्य आणि समाज यांची फारकत न होऊ देता साहित्याने समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत. बंधूभाव वाढविण्यासाठी मदत करावी. ऐक्यभावना वाढीस लावावी. प्रादेशिक भेद संपुष्टात आणण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्नशील राहण्याचा संदेश ते देतात. कारण साहित्याचा आणि समाजाचा अतूट संबंध असल्याचे ते सांगतात. तसेच साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करतात. साहित्यिकांनी श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण करावे आणि राष्ट्रालाही मोठे करावे असेही त्यांना वाटते.

यशवंतरावांना विद्वानांबद्दल व विचारवंताविषयी आदर होता. त्यांच्या ज्ञानावर त्यांची पूर्ण विश्वास असे. अशाच विचारवंतांच्या कार्यावर देश, राष्ट्र जगत असते. सर्व धनापेक्षा विचारधन श्रेष्ठ असते. म्हणून विचारवंत साहित्यिकांनी सर्वांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी सर्व त-हेचे साहित्य निर्माण करणे त्यांना आवश्यक वाटते. कारण पंडितांची, विचारवंतांची, साहित्यिकांची 'अक्षरवाणी' ही देशाला चैतन्यरूप बनवत असते. त्यांच्यात राष्ट्राभिमान जागृत करते. आणि राष्ट्रभावनेचा विकास घडवते. त्यामुळे कुठल्याही देशातील साहित्य आणि साहित्यिक जिवंत राहतात मोठे मोठे सम्राट येतात आणि जातात. त्यांची नामोनिशाणी राहत नाही. परतु शब्दधन, विचारधन हे चिरंजीव व चिरतरुण असते. म्हणूनच सम्राट संपतात, शेक्सपिअर शिल्लक राहतो. तुकारामांचे अभंग बुडविणारे मातीमोल होतात. तुकारामांचे स्थान अभंग राहते. "मानवी मनात अनेक मूळ आशाआकांक्षा असतात. कल्पना असतात आणि त्या प्रकटीकरणासाठी, व्यक्त होण्यासाठी, एक प्रकारे हाका मारीत असतात. शब्दांसाठी त्या भुकेलेल्या असतात. तहानलेल्या असतात. त्यांच्या हाकेला ओ देऊन लेखक, विचारवंत, संशोधक व शास्त्रज्ञ त्यांना लेखनाद्वारा शब्दरूप देत असतात. मराठी भाषिक जनतेच्याही अशा काही आशा, आकांक्षा, इच्छा असून त्या विविध प्रवाही आहेत. त्यांना आपण लेखनाद्वारे शब्दरुप दिले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या सरोवराचे पाट आपण लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचवले पाहिजे." अशा प्रकारचे अतिशय मोलाचे व महत्त्वपूर्ण विचार यशवंतराव येथे मांडतात. जनता म्हणजे मूक कलावंत असतो. त्यांना वाचा देण्याचे कार्य फक्त साहित्यिक करतात. हा विचार अजोड असाच आहे.

लेखकांनी सामाजिक बांधिलकी ठेवूनच लेखन करावे. स्वप्नात भरा-या मारणारे वास्तविक प्रश्नाकडे डोळेझाक करतात आणि स्वप्नाळू समाज निर्माण करतात. एक प्रकारची समाजाची दिशाभूल करतात. हे यशवंतरावांना नको आहे. सामान्यातील सामान्य माणसाचे प्रश्न, त्याचे दु:ख, वेदना साहित्यिकांनी आपल्या शब्दात मांडावी, आणि शक्य झाल्यास ते दु:ख दूर होईल असे पाहावे. त्याचप्रमाणे साहित्यिकांनी भारताच्या कानाकोप-यातील जीवन, विशेषत: ज्यांच्याकडे साहित्यिक अद्यापपर्यंत पोचलाच नाही अशा आदिवासी, दलित, स्त्री जीवनाचे वास्तव चित्रण करून आपल्या अमर साहित्याद्वारे भारतीय समाजजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडवले पाहिजे. साहित्य हे धारदार शस्त्र आहे. ते शस्त्रापेक्षाही अधिक परिणाम साधू शकते. साहित्यातून योग्य संस्कार घडतात. म्हणून अशाच साहित्याच्या निर्मितीची अपेक्षा त्यांच्या विचारातून दिसून येते.