यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-८

कलाकृती कशी दिसते यापेक्षा तिच्यात काय आहे या गोष्टीला जीवनवादी आशयात अधिक महत्त्व दिसते. यशवंतरावांच्या जीवनवादी साहित्याचा विचार करताना त्यांनी केवळ रंजन हे साहित्याचे प्रयोजन मानले नाही. किंवा तशी कलाकृती त्यांनी निर्माण केली नाही. कथा, कादंबरी, नाटक इ. वाङ्मय प्रकार त्यांनी निर्माण केले नाहीत.  तसेच त्यांनी कलावादी किंवा रंजवादी साहित्य निर्मिती केली नाही. कारण केवळ आनंदासाठी लेखन करणे हा प्रांत त्यांना मान्य नव्हता. साहित्यातून पोरकट रहस्ये, आकर्षक उत्तान वर्णने किंवा खोटा आभास निर्माण करणारे भोंगळ तत्त्वज्ञान कलेच्या नावाखाली येऊ नये. कलावंत साहित्यिकाने विचारवंत झाले पाहिजे. आजच्या ख-याखु-या जीवनाची, जीवनविषयक तत्त्वज्ञानाची जोड साहित्याला असली पाहिजे असे त्यांना वाटते. साहित्यातून सर्वसाधारणपणे समाजाची दु:खे चित्रित झाली पाहिजेत. परंतु ती होत नाहीत. याविषयी यशवंतरावांना खंत वाटते. म्हणून ते म्हणतात, साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असली पाहिजे असे मी मानतो. अशा प्रकारे जीवनमूल्यांवर यशवंतरावांची दृढ श्रद्धा होती. जीवनवादात समाजदर्शन किंवा सामाजिक भाष्य त्यांना अभिप्रेत आहे. जीवनातल्या अंतिम सत्याची जाणीव करून देत त्यांनी जीवनवादाचा पुरस्कार केला. उद्बोधन हे एक साहित्याचे प्रयोजन असावे असे त्यांना वाटते. म्हणूनच त्यांनी त्यांना अपेक्षित असणारे जीवन त्यांच्या साहित्यात मांडले आहे.

साहित्याचा आणि समाजजीवनाचा असणारा संबंध यशवंतरावांना अपरिहार्य वाटतो. किंबहुना समाजजीवनाचे वास्तव चित्रण परिणामकारकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ते म्हणतात, "ज्या साहित्यामुळे अमंगलाचा नाश होतो आणि मंगलाची स्थापना होते असे साहित्य उदात्त गुणांची प्रेरणा देऊ शकते. अशा प्रकारचे साहित्य जनतेला प्रगतीच्या दिशेने समाजाला गतिमान करते. आपल्या मनाला अस्वस्थ करून सोडणारे, भोवतालचे खरे वास्तवादी जीवन, जीवनवादी साहित्यात प्रतिबिंबित व्हायला हवे असे विचार त्यांनी व्यक्त केले. यशवंतरावांच्या एकूणच लेखनामागची प्रेरणा सामाजिक स्वरुपाची आहे. या सर्व लेखनातून यशवंतरावांचे जे चिंतनपर विचार विखुरले आहेत ते सर्व अभ्यासनीय आहे.

यशवंतरावांनी जीवनवादाचा पुरस्कार केला. जीवनवाद या शब्दातून यशवंतरावांना केवळ साहित्यातून होणारे जीवनदर्शन अपेक्षित नाही. या जीवनदर्शनात जीवनाच्या अंतिम सत्याचा, मूल्याचा पुरस्कार त्यांना अभिप्रेत आहे. चिरंतन मूल्यांची सामाजिक जाणिवेची कदर साहित्यातून व्हावी ही यशवंतरावांच्या जीवनवादाची अपेक्षा आहे. यातून त्यांची जीवनवादी भूमिका स्पष्ट होते.