समाजाचे जीवन प्रवाही राहते चिरंतन राहते समाज जिवंत राहतो तो त्याच्याजवळ असणा-या भौतिक सामर्थ्याने नाही तर त्याच्याजवळ असणा-या सांस्कृतिक मूल्यांवर व विचारधनावर ! त्यावरच समाज आणि देश जिवंत राहिलेले आहेत. वाढलेले आहेत. असा इतिहासाचा दाखला आहे." यशवंतरावांचा साहित्य आणि साहित्यिकांवर फार मोठा विश्वास होता. बहुजन समाजाच्या सर्व स्तरांमधून नव्या वृत्तीचे, ख-या अर्थाने नवे अनुभव, नवे भावविश्व, नवे सत्य, नवी मूल्ये, नवे संघर्ष, दलित, ग्रामीण, आदिवासी, भटक्या अशा सर्व स्तरांतून नवे साहित्य निर्माण होत आहे. या साहित्यातून आपल्या सुखदु:खाला वाचा फोडण्याचे काम लेखणीवाणीच्या माध्यमातून या नवलेखकांनी करावे असे त्यांना वाटत होते. महाराष्ट्रामध्ये आज वैचारिक लिखाणाची वाण पडलेली दिसून येते. त्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. "मराठी सारस्वत विविध अंगोपांगानी समृद्ध व्हावे आणि मराठी भाषा संपन्न व्हावी म्हणून एका व्यापक अशा वैचारिक बैठकीची आता फार आवश्यकता आहे." यशवंतराव चव्हाण नेहमी साहित्यिकांशी व त्यांच्या कलाकृतीशी संधान साधून असत. साहित्य हे एक सामर्थ्य आहे, कारण ते विचार देणारे आहे असा उल्लेख त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे.
यशवंतराव साहित्याचा अर्थ संकुचित वृत्तीने घेत नाहीत. साहित्यासंबंधी त्यांची दृष्टी विशाल आहे. " जे साहित्य सर्वसामान्य जनतेचे हित साधते ते साहित्य' अशा प्रकारे साहित्याची अतिशय साधी पण अर्थवाही व्याख्या ते करतात. "निव्वळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य ही साहित्याची व्याख्या घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा काळ संपलेला आहे." असा सल्ला त्यांनी साहित्यिकांना दिला आहे. साहित्याने काळाच्या, देशाच्या, परिस्थितीच्या मर्यादेत न राहता सारे जीवन व्यापून राहिले पाहिजे. साहित्याने जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय लोकजीवन समजणार नाही. लोकजीवनातूनच साहित्य निर्माण होते. तेव्हाच त्या साहित्यातून समाजमनाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिबिंब साहित्यात पडते. अशा साहित्याचा परिणाम पुन्हा समाजमनावर घडत असतो. "म्हणून लोकजीवनातूनच साहित्य निर्माण होते असे मानण्यात येते. आवाजाच्या प्रतिध्वनी प्रमाणे ही क्रिया चालत असते. लोकजीवनाचा स्वर साहित्यात उमटतो. आणि साहित्यात त्या स्वराचा असा प्रतिध्वनी निर्माण होतो की, जो पुन्हा लोकजीवनात जाऊन मिसळतो. " अशा प्रकारे साहित्याचा जीवनावर परिणाम घडत असतो. हे चक्र चालूच असते. असे विचार यशवंतराव व्यक्त करतात. समाजजीवनात घडणा-या अनेकविध घडामोडीसंबंधी उत्सुकता आणि ओढ साहित्यिकांना असली पाहिजे. अशा घडामोडी लेखक आपल्या साहित्यातून मांडत असतो. अशाच ठिकाणी सामाजिक जाणीव ही संज्ञा वापरता येईल म्हणजेच साहित्यात भोवतीच्या समाजाचे सुद्धा तपशील व समाजवास्तवाचे काही प्रमाणात सूक्ष्म निरीक्षण असणे गरजेचे आहे. यासाठी जीवनाशी संबंधित अशा विविध विषयांचा अभ्यास, ज्ञान असावे लागते. अशा प्रकारच्या अध्ययनातूनच असे कसदार, दमदार साहित्य निर्माण होते. अशा प्रकारच्या अध्ययनातूनच असे कसदार, दमदार साहित्य निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या सा-या निर्मिती व्यवहाराकडे साहित्यिकाने गांभीर्याने पाहिले पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन होता. साहित्याच्या निर्मितीमध्ये अभ्यासाला, गांभीर्याला जसे अतिशय महत्त्व असते तसेच साहित्यकृतीतील वास्तवतेलाही महत्त्व असते. साहित्यकृतीचा सारा डोलारा उभा असतो तो समाजवास्तवावरच. शब्द, भाषा, निवेदनशैली, विविध प्रसंग, मानवी मनाची भावांदोलने, नाद, लय इ. अनेक घटक साहित्यकलाकृतीमध्ये एकजीव होत असले तरी हे सारेच घटक एकाच केंद्रस्थानाभोवती फिरत असतात आणि हें केंद्रस्थान म्हणजे त्या लेखकाला भावलेले समाजवास्तव. समाजवास्तव ही साहित्यकृतीमधील अतिशय महत्त्वाची बाब असते. यशवंतराव चव्हाण म्हणतात, "मानवी जीवन वैयक्तिक असो वा सामाजिक असो त्याच्या कोणत्याही पैलूची भाषेच्या मदतीने केलेली अभिव्यक्ती साहित्याचे स्वरूप घेते. खरे म्हणजे असल्या साहित्याने मानव आणि मानवोपयोगी प्रकृती ह्यांची अभिव्यक्ती झाली पाहिजे." मानवाचे जगणे, त्याचे अस्तित्व टिकणे, त्याची सुरक्षितता आणि सुखसमृद्धी या सर्व गोष्टी साहित्यात अभिव्यक्त व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा होती.
साहित्यिक हा समाजातच असतो. त्याच्या भोवती सारा समाज वेढून राहिलेला असतो. किंबहुना लेखकाच्या ब-यावाईट घडणीसाठी भोवतीचा समाज, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकारण इ. अनेक बाबी जबाबदार असतात. लेखन हे आत्मनिष्ठ असते असे कितीही म्हटले किंवा लेखकाचा तो वैयक्तिक आविष्कार असतो असे म्हटले तरी त्याच्या जडणघडणीत वरील सा-याच बाबीना महत्त्व असते. म्हणजेच भोवतीच्या समाजातून तो घडत असतो आणि तो व्यक्त करतो ते अनुभवही त्याच समाजातले असतात. ते लिहितात, "साहित्य हे सुद्धा एक अर्थाने जीवनाची समीक्षा आहे.